

पाथर्डी: तालुक्यातील पूर्व भागातील चिंचपूर इजदे येथे सोमवारच्या अतिवृष्टीने किना नदीला आलेल्या पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या दहा गाळ्यांची पडझड होऊन त्यामधील चहा, सलून, वडापाव, फर्टिलायझर आदी व्यावसायिकांचे सर्व साहित्य वाहून गेले. रस्ते, स्मशानभूमी, पाणीपुरवठा पाइपलाईन, वीजपंप, खांब, रोहित्रे, सोलर पॅनल यांचे नुकसान आहे. फळबागा, उभी पिके, काढलेला कांदा, शेती अवजारे वाहून गेली. (Latest Ahilyanagar News)
कुत्तरवाडी तलाव तसेच गर्भगिरीच्या डोंगरपट्ट्यातून आणि बीड जिल्ह्यातून आलेल्या प्रचंड पाण्यामुळे चिंचपूरला पुराचा तडाखा बसला. कुत्तरवाडीतही मोठी हानी झाली. चिंचपूर इजदे येथे उभारलेले मंदिर खचले. गावातील किराणा दुकानांत पाणी शिरले. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून धान्य, खाद्यपदार्थ व संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. इंदुबाई खेडकर यांच्या घरकुलाचे नुकसान झाले. आजिनाथ निवृत्ती खेडकर यांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य व धान्य भिजले. नारायण रघुनाथ नागरगोजे यांचे हॉटेलचे साहित्य वाहून गेले.
पंचनामे करून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी अशोक खेडकर, विजय मिसाळ, बाळासाहेब नागरगोजे, सतीश राऊत, विष्णू खेडकर, अॅड. उद्धव खेडकर, शरद खेडकर आदींनी केली आहे.
दरम्यान, खासदार निलेश लंके यांनी बुधवारी तालुक्यातील पिंपळगाव टप्पा, चिंचपूर इजदे, कुत्तरवाडी, आल्हणवाडी, घुमटवाडी या गावांमध्ये पाहणी केली. शासनाने लोकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आधार देण्याचे काम करावे. लवकरात लवकर मदत कशी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. नागरिकांनी धीर धरावा, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडुपाटील बोरुडे, सीताराम बोरुडे, वैभव दहिफळे, दत्तात्रय खेडकर, एम पी आव्हाड, योगेश रासने, अमोल पाठक, बबलु वावरे, सोमनाथ माने हे उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यात सोमवारी पुरात वाहून गेलेल्या दोन जणांचा अद्याप तपास लागला नाही. अजूनही पाण्याचा प्रवाह ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. माणिकदौंडी येथील राजू शिवाजी सोळंके (वय 39) देवळाली नदीत वाहून गेले, तर टाकळी मानूर परिसरातील गणपत हरिभाऊ बर्डे (वय 65) घाटशीळ पारगाव तलावात वाहून गेले. या दोघांचाही अद्याप तपास लागलेला नाही. आपत्ती व्यवस्थापन पथके शोध कार्य करीत आहेत.