

नेवासा : तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील रामनाथ भीमराज शिंदे हे तब्बल दहा वर्षांपासून बेपत्ता होते. कुटुंबीय व गावकऱ्यांना त्यांचा कुठलाही पत्ता लागला नव्हता. मात्र, सोशल मीडियावरून अचानक मिळालेल्या एका व्हिडिओमुळे त्यांचा शोध लागला.(Latest Ahilyanagar News)
गेल्या 14 जुलै रोजी मध्यरात्री 12.45 वाजता सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झाला. तो पंजाबमधील अमृतसर येथून मेजर अण्णासाहेब कल्याण आदलिंगे (रा. अंजनगाव उमाटे, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी शेअर केला होता. कामानिमित्त अमृतसरला गेलेल्या आदलिंगे यांची भेट योगायोगाने रामनाथ शिंदे यांच्याशी झाली. मराठी भाषेतून झालेल्या संवादामुळे त्यांची खरी ओळख पटली आणि मेजर आदलिंगे यांनी तत्काळ हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला.
सायंकाळी हा व्हिडिओ शिंदे कुटुंबापर्यंत पोहोचताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. लगेचच त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर रामनाथ शिंदे आणि पुतण्या प्रकाश विठ्ठल शिंदे अमृतसरला रवाना झाले. अमृतसरसारख्या दूरच्या प्रदेशात जाऊनही मेजर आदलिंगे यांनी दाखवलेले सहकार्य उल्लेखनीय ठरले. आपल्या या सहकार्याबद्दल आम्ही जन्मोजन्मी ऋणी राहू, असे शिंदे कुटुंबाने भावूक होत सांगितले.