

जामखेड : जामखेडमधील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर लघुशंका करणाऱ्या तीन तरुणांना इथे लघवी करू नका, अशी विनंती करणाऱ्या २० वर्षीय युवकाला बेदम मारहाण करत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी आदित्य बबन पोकळे (वय 20 वर्षे) या युवकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून या घटनेनं जामखेडमधील कायदा- सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतायंत.
आदित्य पोकळेयाने फिर्याद दिली की, रविवारी रात्री दहा वाजता विंचरणा नदीजवळ असलेल्या पोकळे वस्तीवरील घराजवळ महिला आणि इतर सदस्य होते. यावेळी चारचाकी वाहनातून तीन अज्ञात इसम उतरले व ते तेथे लघुशंका केली. आदित्यने त्यांना येथे लघुशंका करू नका इथे महिलाही बसल्या आहेत असे या तीन व्यक्तींना सांगितले.
याचा त्या तिघांना राग आल्याने त्यांनी आदित्यला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी तेथे कुणालही आला. यादरम्यान तीन अज्ञातांनी पिस्टलने या दोघांवर गोळीबार केला. कुणाल पवार याच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक महेश पाटील हे घटनेचा तपास करत असून लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल असे सांगितले.
अज्ञात तरुणांनी केलेल्या गोळीबारात आदित्यचा मित्र कुणाल बंडु पवार (वय २० रा. जामखेड) याच्या पायाला गोळी लागली. त्याच्यावर अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. घटना घडताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन तीन पथकांना आरोपीच्या शोधार्थ पाठवले आहे.
गोळीबाराच्या घटनेने जामखेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी सोशलमिडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. जामखेडमध्ये रात्री दहाच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आलं. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन दहशतीत रहावं लागत आहे. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत पोस्ट केली आहे.