

कोल्हारः एरवी तरुंगाचे मजबुत गज तोडून, आरोपी पसार झाल्याचे वृत्त आपण ऐकले असणारच, मात्र याही पुढे जावून, पिंजर्यात रात्री जेरबंद झालेला तब्बल पाचवा बिबट्या दिवस उजाडण्याच्या आतच पिंजर्यातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेतून वन विभागाचे पिंजरे किती कमकुवत आहेत, याचे पितळ उघडे पडले आहे.
शुक्रवारी रात्री पिंजर्यात अडकलेल्या या बिबट्याला शनिवारी सकाळी वन खात्याचे कर्मचारी घेऊन जाणार होते, परंतू दिवस उजाडण्याच्याआतच कमकुवत, कुचकामी पिंजर्याच्या तळातला प्लायवूड ताकदवान बिबट्याने धारदार नख्यांनी तोडून पिंजर्यातून धूम ठोकली. (Latest Ahilyanagar News)
यामुळे या परिसरातील रहिवासी व शेतकरी दहशतीखाली आहेत. अक्षरशः जीव मुठीत धरुन ते वावरत आहेत. प्लायवूड तोडलेला पिंजरा वन कर्मचार्यांनी परत नेला आहे. दरम्यान, नवाळे वस्तीजवळील योगेश कोळकर व भैय्या कोळपकर यांच्या पेरूच्या बागेत लावलेला दुसरा नवा पिंजरा आणला आहे.