

घारगाव: प्रसूती कळा सुरू झाल्याने झोळी करून रुग्णालयात आणल्या जात असलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. जंगल आणि घाटमाथ्यावर दगडधोंड्यांच्या ओबडधोबड रस्त्यात सोबत असलेल्या मोजक्याच महिलांनी आडोसा धरून कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय तिची सुखरूप प्रसूती केली. जग विज्ञान-तंत्रज्ञानाच्या (प्रगतीच्या!) अत्युच्च शिखरावर असताना, विशेषतः ‘मोबाईल क्रांती’च्या युगात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजेच सन 2025 मध्ये मे महिन्याच्या 29 तारखेला अकोले तालुक्याच्या पठार भागातील जांभळे गावच्या ठाकरवाडी वस्ती परिसरात वाहनायोग्य रस्ता नसल्याने ही घटना घडली!
पठार भागातील जांभळे गावासह वाड्या-वस्त्यांचा हा अतिदुर्गम भाग आहे. त्यात आदिवासी समाजाच्या ठाकरवाडी वस्तीला रस्त्याअभावी विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. वस्तीसाठी रस्ता व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली; मात्र अद्याप रस्ता झाला नाही.
ठाकरवाडी वस्तीवरील दशरथ मधे यांची गरोदर पत्नी प्रतीक्षा यांना गुरुवारी (दि. 29) सकाळी प्रसूती कळा सुरू झाल्या. मदत मागण्यासाठी मधे धावतपळत साधारण दोन किलोमीटरवरील जांभळे गावातील शिक्षक राज गवांदे यांच्या घरी गेले. गवांदे यांनी तातडीने स्वतःची मोटार घेऊन घाटमाथ्याच्या ओबडधोबड रस्त्याने वस्तीकडे निघाले. त्या वेळी पाऊसही सुरू होता. रस्त्याने गाडी नेण्यास विविध अडथळे निर्माण झाले. घाटमाथ्यापर्यंत कशीबशी गाडी नेली.
तेथून ते पायी मधे यांच्या घरी पोहचले. तेथील काही महिला व रहिवाशांच्या मदतीने प्रतीक्षा मधे यांना झोळी करून घाटमाथ्यापर्यंत नेऊ लागले. मात्र प्रतीक्षा यांना मोटारीपर्यंत पोहचण्याआधीच तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या.
मोठे संकट उभे राहिलेे. सोबत प्रतीक्षा यांची सासू व आई, तसेच अन्य महिला होत्या. त्यांनी तातडीने रस्त्यातच आडोसा धरला. कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय साहित्य अथवा सुविधा नसताना घाटमाथ्यावर प्रतीक्षा यांची सुखरूप प्रसूती केली. एका गोंडस बाळाचा जन्म झाला. माता व बाळ दोघे सुखरूप आहेत.
दरम्यान, ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांच्याशी फोनवर संपर्क साधण्यात आला. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका जांभळे गावात पाठवली. शिक्षक राज गवांदे यांच्या मोटारीतून नवजात बाळ व मातेला घाटमाथ्यावरून ओबडधोबड रस्त्याने जांभळे गावापर्यंत आणले. त्यातही मोटार एकदा गाळात अडकली होती. रुग्णवाहिकेतून दोघांना ब्राह्मणवाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
ठाकरवाडीचा रस्ता केव्हा होणार, हा प्रश्न या प्रसूतीमुळे पुन्हा एकदा टर्चेत आला. सन 2015 मध्ये जांभळे ग्रामपंचायतीने हा दोन किलोमीटरचा अवघड घाटरस्ता करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अपुर्या निधीमुळे आणि वन विभागाच्या अडचणीमुळे काम थांबले, असे सांगण्यात येते. मात्र या अशा रस्त्यामुळे पावसाळ्यात आजारी वयोवृद्ध महिला-पुरुषांना आजही झोळी करून रुग्णालयात न्यावे लागते.