

पुणे : नालायक औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेली मंदिरे, घाट यांचे पुनर्निर्माण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी यांचे कार्याचे स्मरण केले. अहिल्यादेवी यांच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेशर मंदिराचे पुनर्निर्माण केले असेही त्यांनी यावेळी सांगितले
भारतीय युवा मोर्चा वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ,आमदार हेमंत रासने , शंकर जगताप, योगेश टिळेकर, विक्रांत पाटील, भारतीय युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, दुर्दैवाने आपल्याला खरा इतिहास शिकवला गेला नाही. मुघलांचे राज्य जाऊन इंग्रजाची राजवट आली हे खरे नाही. या दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या स्वरूपात चालविले जात होते. माळवा प्रांतात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्ष राज्य कारभार चालवत तळागाळातील लोकांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले. तसेच परकीय आक्रमकांनी भारतीय संस्कृतीची पाळेमुळे फोडून काढण्याचा प्रयत्न केला. अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्माची प्रतीके असलेले घाट, ज्योतिर्लिंग, शक्ती स्थळांचे, भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले.
त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने त्यांचे जन्मगाव चौंडी येथे मंत्रिमंडळची बैठक घेऊन ज्योतिर्लिंग विकासाचा आराखडा तयार केला. राज्यात सक्षम अहिल्यादेवी घडवून महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्याचे कार्य करणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.