

नगर तालुका: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले असून, शिवसेना पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि. 24) शहरात शिवसेना ठाकरे गटाची बैठक प्रा. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. (Latest Ahilyanagar News)
या बैठकीस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे आणि महाराष्ट्र धर्मासाठी सज्ज असलेले शिवसैनिक निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार या बैठकीत मांडण्यात आला.
या वेळी प्रा. गाडे म्हणाले की, शिवसेनेचे ज्या गटात, गणात व प्रभागात विद्यमान सदस्य व नगरसेवक आहेत त्या जागा शिवसेनेकडेच राहतील.
इच्छुकांनी आता निवडणुकीसाठी सज्ज व्हावे. सामान्य जनता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नगर तालुक्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. खा. लंके यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करून आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील जागावाटप निश्चित करणार असल्याचे संकेत गाडे यांनी बैठकीत दिले.
शिवसेना आता नव्या जोमाने जनतेसमोर जात असून स्थानिक पातळीवरील प्रश्न, विकासकामे, शेतकरी, तरुण, महिला आणि सामान्य जनतेच्या हितासाठी समर्पित भावनेने काम करणार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.