

कोपरगाव: कोपरगावमध्ये दोन दिवसांपासून पावसाचे कमी- अधिक प्रमाण असले तरी, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणांच्या पाणलोटामध्ये पावसाची संततधार सुरु असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, काल (सोमवारी) दुपारी गंगापूर धरणातून 3,944, दारणा 4,074, कडवा 4,75 तर, नांदुर मधमेश्वर सांडव्यातून 9, 465 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. गोदावरी नदी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता सोमवारी संध्याकाळी वर्तविण्यात आली. (Latest Ahilyanagar News)
नाशिक शहरातही गोदा पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. दुतोंड्या मारुतीरायाच्या गुडघ्याला पाणी लागल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. अहिल्यादेवी होळकर पुलाखालून 4, 881 द.ल.घ.फूट पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
कोपरगाव शहरासह तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. पडणारा पाऊस, ‘कोरडं झालं की, ओलं करणारा, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. कोपरगांव शहरातच काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी, निवारा व ‘संजीवनी’ परिसरात पावसाचा एकही थेंब पडला नाही. तालुक्यातही अशीच काहीशी परिस्थिती दिसत आहे.