

संगमनेरः प्रवरा नदीकिनारी संगमनेर खुर्द गावच्या शिवारातील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार संगमनेर शहर पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली.
रोकड, मोटारसायकली, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 5 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. (Latest Ahilyanagar News)
संगमनेर मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. विशेषतः मटका व जुगारातून अनेकांनी दहशत निर्माण केली. या आशयाची चर्चा शहरात सुरू आहे. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे यांच्या विशेष पोलिस पथकाने दोन दिवसांपूर्वीच शहरातील दोन मोठ्या मटका चालकांविरुद्ध कारवाई केली.
संगमनेर खुर्दमधील या बहुचर्चित जुगार अड्ड्यावर पोलिस कारवाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत पोलिस हवालदार आत्माराम दत्तात्रय पवार यांनी फिर्याद दाखल केली. संगमनेर खुर्द येथे पत्र्याच्या शेडमध्ये ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर संगमनेर पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यामध्ये 28,200 रुपयांची रोकड, 3 लाख 65 हजाराच्या 6 दुचाकी, 1 लाख 18 हजाराचे 9 मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 5 लाख 11,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी जुगार खेळणार्या व खेळविणार्या 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अनिल राक्षे (49), शिवाजी चव्हाण (42, रा. अकोले नाका, संगमनेर), शाम बेल्हेकर (40), वाहिद पठाण (37, सय्यद बाबा चौक, संगमनेर), राजेंद्र जोर्वेकर (52, रा. एकता नगर, संगमनेर), सूरज कतारी ( 34, रा. कतारगल्ली, संगमनेर), संपत पवार (वय 45, रा. संजय गांधीनगर, संगमनेर), तुळशीराम वाळुंज (65, रा. कोल्हेवाडी, संगमनेर), अक्षय वाघमारे (25) व अक्षय ऊर्फ मोबी कतारी (दोघेही रा. कतारगल्ली, संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या जुगारींची नावे आहेत.
सर्वजण स्वतःच्या फायद्यासाठी ‘तिरट’ हा पत्त्यांचा जुगार खेळताना रंगेहात आढळले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग करीत आहे.
संगमनेरातील गुन्हेगारी नियंत्रणात येणार का?
जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानंतर अवैध धंद्यांविरुद्ध होणार्या कारवाईंमुळे संगमनेरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.