

राहुरी: फौजफाट्यासह आलेल्या पोलिस पथकाला दूरवरुनच पाहत, ‘पळा... पळा..! पोलिस आले रे.. पोलिस आले..!’ अशी एकमेकांना हाक देत, शहरातील अवैध धंदेवाल्यांनी धूम ठोकली. दरम्यान, या गडबडीत काहींची चांगलीच धावपळ उडाली.
परिविक्षाधिन पोलिस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी, अचानक सायंकाळी फौजफाट्यासह आपला मोर्चा अवैध व्यावसायिकांकडे वळवून, धडक कारवाई केली. दरम्यान, पोलिसांचा फौजफाटा पाहून, दोन अवैध व्यवसायिकांनी दुकाने बंद करुन, पळ काढल्याचे दिसले. (Latest Ahilyanagar News)
श्रीशनि चौक, नवी पेठ, जूने बस स्थानक आदी भागात पायी फिरून, पोलिस अधिकारी खाडे यांनी खाकी वर्दीची ताकद दाखवून दिली. यावेळी बघणार्यांची प्रचंड गर्दी दाटली होती. दरम्यान, या धडक कारवाईची संपूर्ण राहुरी तालुक्यात मोठी चर्चा सुरु आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपाधिक्षक संतोष खाडे, राजेंद्र वाघ, शकील शेख, दिगंबर कारखिले, शंकर चौधरी, अरविंद भिंगारदिवे, अजय साठे, , मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनील पवार, सुनील दिघे, अमोल कांबळे, अक्षय भोसले, संभाजी बोराडे, जालिंदर दहिफळे, ढाकणे, जाधव आदींच्या पोलिस पथकाने यशस्वी केली.
अवैध धंद्यावाल्यांची, ‘पळता भूई थोडी..!’
परिविक्षाधिन पोलीस उप अधिक्षक संतोष खाडे अहिल्यानगर जिल्ह्यात हजर झाल्यापासून, ‘सिंगम स्टाईल’ने धडक कारवाया सुरु केल्या आहेत. यामुळे अवैध धंद्यावाल्यांची, ‘पळता भूई थोडी’ झाल्याचे वास्तव दिसत आहे. सायंकाळी 7 वाजेनंतर खाडे यांनी पोलिस पथकासह राहुरी शहरात धाडी टाकल्या. शहरातील गुटखा- मावा विकणार्या पान टपर्या, मटका चालविणार्या टपर्या, अवैध दारुचे अड्ड्यांवर छापे टाकले.
‘त्या’ महिलांनी ठोकली धूम..!
राहुरी बस स्थानकासमोरील एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. तेथील एका संशयित जोडप्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. वेश्या व्यवसाय करणार्या काही महिलांनी पोलिस पथकाला पाहून धूम ठोकली. दरम्यान, राहुरीतील अनेक अवैध व्यवसायिक पोलिसांचा फौजफाटा पाहून सैरावैरा पळाले.