

राहुरी: आजमितीला केवळ सत्ताधारी नेत्यांच्याच साखर कारखान्याला शासन मदत करत आहे. सत्तेसोबत असणार्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना शासकीय, एनसीडीसीचे कर्ज मिळाले. विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला शासनाने कर्ज नाकारले.
माजी आ. राहुल जगताप व शिरूरचे अशोकबापू पवार यांचे उदाहरण सांगतानाच तनपुरे कारखान्याच्या हिताचा विचार करून अध्यक्ष अरुण तनपुरे हे कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेल्याचा खुलासा करतानाच मी मात्र शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याचा दावा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. (Latest Ahilyanagar News)
राहुरी येथे माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री तनपुरे यांनी भूमिका स्पष्ट केली. तनपुरे म्हणाले, काका अरुण तनपुरे व समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला असला तरीही माझी निष्ठा शरद पवारांशी कायम आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात केवळ शिक्षण विचारत मला राज्यमंत्री पद देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतल्याची आठवणही प्राजक्त तनपुरे यांनी सांगितली.
सहकार क्षेत्रामध्ये अरुण तनपुरे यांचे पारदर्शक कामकाज तसेच बाजार समितीचा आदर्शवत पाहता सभासदांनी तनपुरे गटाला मताधिक्य दिले. पूर्वी कारखान्याचे संचालक अत्यल्प मताने निवडून येत, परंतु यंदा 2 ते 3 हजाराच्या फरकाने 21 विरुद्ध शून्यने सत्ता मिळाली.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे व संचालक मंडळाला शासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे. विनापरवाना गाळप केले तसेच अवैध गौण खनिज उत्खननाबाबत शासनाने दंडात्मक कारवाई केलेली आहे. दंडाची ही रक्कम माफी मिळावी. जिल्हा बँकेचे 130 कोटीचे कर्ज एकरकमी फेड करून कारखान्याला पाठबळ द्यावे अशी अपेक्षा प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, काका व त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले असले तरीही मी शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे माजी मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. मविआच्या सत्तेत शरद पवार यांनी 6 खात्याचे राज्यमंत्री पद दिले. त्यामुळेच राहुरी मतदार संघाला न्याय देताना तब्बल 1250 कोटी रुपये निधी मिळाला होता. निळवंडेचे पाणी राहुरीत आणले.
ऊर्जा खात्याच्या माध्यमातून पुढील 25 वर्षांचे नियोजन करीत गावागावात विजेचे जाळे निर्माण केले. महाविकास आघाडी शासन काळात शरद पवारांमुळेच ही कामे करता आली, त्याची जाण ठेवत आगामी काळातही राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण तनपुरे यांनी माध्यमांसमोर दिले.
चुलते अरुण तनपुरे अजित पवारांसोबत गेल्याने पुतणे प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेणार याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र त्यावर भूमिका स्पष्ट करत तर्कविर्तकांना प्राजक्त तनपुरे यांनी पूर्णविराम दिला.
राहुरीत आघाडीच्या राजकारणाची परंपरा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात भूमिका विचारताच प्राजक्त तनपुरे म्हणाले, राहुरीत पूर्वीपासूनच आघाडीचे राजकारण चालत आले आहे. काँगे्रस पक्षात असलेले तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची राहुरीत आघाडी होती.
वेगवेगळ्या पक्षाची आघाडी होत असते. त्याचा सदंर्भाने आगामी काळातही वेगवेगळ्या पक्षाची आघाडी होईल, असे सूतोवाच माजी मंत्री तनपुरे यांनी केले. राष्ट्रवादी दोन गटांत विभागल्यानंतर राज्यात वेगळे असणारे राष्ट्रवादीचे दोन्ही गट राहुरीत एकत्र असणार असे संकेत माजी मंत्री तनपुरे यांनी दिले.