

Loan waiver demand leads to protest
कर्जत: सरकारने तत्काळ शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच राज्यातील माता-भगिनींच्या अपमानाबद्दल माफी मागावी व कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने समित्या नेमून मराठी माणसावर हिंदी भाषा लादू नये, अशी मागणी करत शिवसैनिकांनी हिंदी भाषा सक्ती करण्याचा जीआर जाळला.
कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये आगामी निवडणुका लढविण्याबाबत जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शिवसैनिकांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हातामध्ये भगवे झेंडे घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Latest Ahilyanagar News)
आंदोलनात कर्जत तालुकाप्रमुख बळिराम यादव, जामखेड तालुकाप्रमुख अॅड. मयूर डोके पाटील, समन्वयक सुभाष जाधव, तालुका संघटक मालोजी काकडे, व्यापारी आघाडीचे प्रमुख महावीर शेठ बोरा, जामखेड तालुका संघटक गणेश उगले, युवा सेनेचे शहरप्रमुख दीपक मांडगे, नाझीम काझी, बबन दळवी, बबन जंजिरे, शिवाजी नवले, सुभाष सुद्रिक, महेंद्र धोदाड, राजीव घालमे, अशोक जाधव, डॉ. गव्हाणे, सुहास मदने, भरत पवार, कृष्णा रंधवे, माऊली जंजिरे, पोपट धनवडे, अमोल सुपेकर, मोहन घालमे, लखन जगताप, रोहित तोरडमल, विटा नवसारी, संतोष गायकवाड, अनिल यादव, अक्षय तोरडमल, नंदू पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी भाजप आणि त्यांचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी तयारी करावी
शिवसैनिक पदाधिकार्यांच्या बैठकीत दळवी म्हणाले की, आगामी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना तयारी करण्यासाठी आदेश दिले आहेत. राज्यातील सरकार हे फसवून व खोट्या मतांची आकडेवारी तयार करून सत्तेवर आले आहे. आता हे सर्व जनतेच्या लक्षात आले आहे. शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ म्हणून सत्ता मिळवणार्या या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणावा व आगामी सर्वच निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी तयारीला लागावे, असे आवाहन केले. या वेळी सुभाष जाधव, मालोजी काकडे, मयूर डोके पाटील यांची भाषणे झाली.