Contaminated Water Tank in Taklibhan
टाकळीभान: टाकळीभान ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षामुळे पाण्याच्या टाकीला झाडे, झुडपे व वेलींनी विळखा घातला आहे. तातडीने ही वाढलेली झाडे, झुडपे व वेली काढून या परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
टाकळीभान ग्रामपंचायतीने गावाला पुर्ण दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या शासनाच्या निधीतून अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. वाजत गाजत या टाक्यांचे उद्घाटनही केलेले आहे. (Latest Ahilyanagar News)
मात्र यापैकी अनेक टाक्यांमध्ये पाणीच गेले नाही. त्यामुळे या टाक्या केवळ शोभेच्या वस्तु म्हणुन दिमाखात उभ्या आहेत. त्या जिर्ण झाल्या आहेत. त्या टाक्या कधी कोसळतील याची खात्री देता येत नाही. जुन्या मराठी शाळे जवळील टाकी अनेक दिवसांपासून मोडकळीस आलेली असल्याने व या टाकी लगतच मोठी लोकवस्ती असल्याने गेल्या 10 वर्षांपासून ही टाकी पाडण्याची मागणी होत आहे मात्र सुस्त ग्रामपंचायत प्रशासन नागरीकांच्या जिवीताशी खेळत आहे.
बाजार समितीच्या आवारातील, हायस्कुल शाळेच्या आवारातील, धुमाळ वस्ती परीसरातील व इतर पाण्याच्या टाक्यांची यापेक्षा वेगळी आवस्था नाही. विकासाच्या नावाखाली सुमारे दहा पाण्याच्या टाक्या बांधलेल्या असल्या तरी नागरीकांना त्याचा काडीचाही उपयोग होत नसल्याने भुईफाट्यानेच कमी दाबाच्या पाण्यावर पाणी पुरवठा सुरू असल्याने टाक्या बांधुन नेमका विकास कोणाचा झाला ? असाही प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.
गेल्या साडेचार वर्षात ग्रामपंचायत प्रशासनाचे नागरीकांच्या मुलभुत समस्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याने नागरीकही समस्यांच्या विळख्यात गुरफटले गेले आहेत. अनेक विकास कामे निधी असूनही ठप्प आहेत. एवढ्या मोठ्या लोक वस्तीच्या ग्रामपंचायतीचा कारभार पहाण्यासाठी ग्रामसेवकही प्रभारी आहे. आठवड्यातून एखादा दिवस काही वेळ ग्रामसेवक ग्रामसचिवालयाला भेट देवून गायब होतात. नागरीक मात्र हेलपाटे मारतात व गपगुमान मागे फिरतात. असा हा तकलादू कारभार सुरु असल्याने दाद मागायची तरी कोणाकडे असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
राजकीय जिरवाजिरवीत ग्रामस्थांची पोटदुखी वाढली
टाकळीभानमध्ये राजकीय जिरवाजिरवी सुरू आहे. मात्र याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे. मुख्य गावठाण परिसरात होत असलेला पाणी पुरवठा कमी दाबाने होतो. त्याचबरोबर काही वेळेस खराब पाणी येते. या पाण्याला र्दुगंधी येते, अनेकांचे पोट बिघडले आहे. ग्रामपंचायतीने या पाण्याची तपासणी करावी व नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरीकांतून करण्यात आली आहे.