

पारनेर: लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण सुजित झावरे पाटील आहेत. राजकारणात काही वेळा विश्वासघात झाला असेल, परंतु तुम्ही आता एकनाथ शिंदेंसोबत आहात. भरोसे का दुसरा नाम एकनाथ शिंदे है, एक तो कमेंट करता नहीं मगर एक बार कमिटमेंट की तो मै खुद की भी नही सुनता, असे म्हणत सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानत या राज्यातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्यात मोठी ओळख आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Latest Ahilyanagar News)
जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचा शिवसेना पक्षप्रवेशप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आ. शरद सोनवणे, आ. विठ्ठल लंघे, आ. अमोल खताळ, माजी आ. भानुदास मुरकुटे, सदाशिव लोखंडे, प्रताप कुलट, संदेश कार्ले, बाबूशेठ टायरवाले, संजीव भोर, राम रेपाळे, संभाजी कदम, रामदास भोर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सुजित झावरे यांच्यामागे धनादेश नाही; पण जनादेश आहे. वसंतराव झावरे यांना दलित, आदिवासी, गरीब देव मानायचे. झालेली गर्दी ही त्या कामाची प्रचिती आहे, असे सांगून लाडकी बहीण योजना सुरू केली, तेव्हा विरोधकांनी खोडा घातला. ज्यांनी विधानसभेला 110 जागा लढवल्या. त्यापैकी त्यांच्या फक्त 20 जागा आल्या. आम्ही 80 जागा लढवून 60 जागा निवडून आणल्या. त्यामुळे कोणी कितीही खोट्या अफवा पसरवल्या, तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, लोकांनी आम्हाला स्वीकारल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या वेळी सुजित झावरे म्हणाले की, सन 2024च्या निवडणुकीत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असता तर चित्र वेगळे असते. विकास निधीसाठी डोक्यावर हात द्या. विकासकामांना निधी द्या व ती देण्याची दानत असणारा माणूस म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे, असे सांगून शहराचा कृती आराखडा व पाणी योजनेला मंजुरी मिळावी. सुपा येथे औद्योगिक वसाहतीत कचरा डेपो प्रक्रियेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा व पारनेर व कान्हूर पठार या दोन मंडलांना अतिवृष्टी होऊनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही ती मिळावी. विद्यमान लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर रोहयोची कामे थांबवली ती सुरू करावीत अशी मागणी झावरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, शहराचा डीपीआरला तात्काळ मान्यता देऊ. कचरा प्रकल्पासाठी निधी देऊन सर्व अडचणी सोडवल्या जातील. पारनेरची पाणी योजना मंजूर करू, तसेच अतिवृष्टीत कान्हूर पठार व पारनेर मंडळाला शेतकऱ्यांना निधी मिळाला नाही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तातडीने त्याबाबत निर्णय घेऊ तुम्हाला त्याचा त्वरित रिझल्ट मिळेल, असे सांगितले.
या वेळी बाळासाहेब माळी, आनंदराव शेळके, सुप्रिया झावरे, खंडू भुकन, सुरेश पठारे, योगेश रोकडे, रवींद्र पडळकर, सतीश पिंपरकर, अमोल साळवे, राधूजी ठाणगे, निजामभाई पटेल, मीराताई शिंदे, सुभाष करंजुले, बी. एल. ठुबे, रेश्मा जगताप, बापूसाहेब भापकर, प्रसाद झावरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
धनुष्याने योग्य दिशेने निशाणा साधा!
मी ज्याच्या मागे उभा राहतो ते पूर्ण ताकदीने. तुम्ही एवढे वर्षे जे काम उभे केले ते वाया जाऊ देणार नाही. शिवसेनेत तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर ताकद देण्याचे काम केले जाईल. कार्यकर्त्यांना सन्मान करणारा शिवसेना पक्ष आहे. योग्य वेळी योग्य घरात आलात. सोसायटी तीच, घराचा नंबर बदलला; पण हा लकी नंबर आहे. धनुष्य हाती आहे. योग्य दिशेने निशाणा साधा. यापुढे तुमच्या अडचणी त्या माझ्या अडचणी ते सोडवण्याचे काम यापुढे केले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
14 वर्षांचा वनवास संपला
वसंतदादांनी निष्ठेने राष्ट्रवादीचे काम करूनही पक्षाने अनेकदा उमेदवारी कापली. 2019मध्ये संधी असताना उमेदवारी न देता शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली. वसंत झावरे यांनी वाडी-वस्त्यांवर घड्याळ पोहोचवले तसे वाडी वस्तीवर शिवसेनेचा धनुष्य पोहोचवण्याचे काम येणाऱ्या काळात करणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.