

बोधेगाव : नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शेवगावमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, शहरात सत्तेच्या समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकीत कोण कोणासोबत युती करणार, कोण स्वबळावर लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Latest Ahilyanagar News)
शेवगाव नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), तसेच जनशक्ती मंच या प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. नगरपरिषदेत वर्चस्व मिळवण्यासाठी या सर्व पक्षांमध्ये हालचाली जोरात सुरू आहेत.
भाजपकडून आ. मोनिका राजळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आ. चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे तालुकाध्यक्ष हरीश भारदे, तर जनशक्ती मंचकडून ॲड. शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांनी आपापल्या गोटात बैठका व संपर्क मोहीम सुरू केली आहे.
नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने या वेळी महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. प्रत्येक पक्षाकडून प्रबळ महिला उमेदवार निवडण्यासाठी अंतर्गत चर्चेला गती मिळाली आहे.
एकूण 24 जागांसाठी ही निवडणूक होणार असून, प्रत्येक प्रभागात दोन सदस्यांची निवड होणार आहे. त्यामुळे शेवगाव नगरपरिषद निवडणूक यंदा बहुरंगी आणि चुरशीची होण्याची शक्यता राजकीय हालचालींवरून दिसत आहे.