

संगमनेर/ आश्वी: संगमनेर तालुक्यातील कोळवाडे, अंभोरे, डिग्रस, मालुंजे व पानोडी या दुष्काळ गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू होते, मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून निळवंडे डावा - उजवा या दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे यंदा निळवंडे उजवा कालव्याला पाणी आले. पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचणाची टंचाई दूर होवून, टँकरही बंद झाले आहेत, असे प्रतिपादन माजी खासदार, पद्मश्री विखे साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील मालुंजे येथे प्रथमच निळवंडे उजव्या कालव्याचे पाणी पाझर तलावात आले. त्याचे जलपूजन डॉ. सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. (Latest Ahilyanagar News)
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुगे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, भाजप तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे, माजी सभापती अंकुश कांगणे, भाजप उपाध्यक्ष संदीप घुगे, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात, पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाब सांगळे, सरुनाथ उंबरकर, मालुंजेच्या सरपंच सुवर्णा घुगे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रवीण कानवडे, जोवर शेख, ज्ञानदेव वर्पे, शरद भालेराव, अनिल नागरे, सुरेश काळे, दिलीप वर्पे, जल संपदाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, उप अभियंता शेवाळे, माने व ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले की, मालुंजेतील पाझर तलावात पाणी आले. यामुळे या भागातील पाण्याचे टँकर बंद झाले. या पाण्यामुळे परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे. महिला- पुरुष शेतकरी समाधानी झाले आहेत.
जलसंपदा व पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून पाझर तलावात पाणी आले आहे. या पाण्यामुळे सर्वसामान्य जनता आनंदली आहे, असे समाधानाचे बोल त्यांनी ऐकविले.
डिजेच्या तालावर महिलांनी धरला ठेका!
संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात पिण्यासाठी पाणी नव्हते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. परंतु जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या अथक प्रयत्नातून निळवंडे उजवा कालव्याचे पाणी अखेर मालुंजे पाझर तलावात सोडण्यात आले. यामुळे काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीत डिजेच्या तालावर तरुणांसह महिलांनी ठेका धरीत आनंदोत्सव साजरा केला.
क्रेनच्या साह्याने डॉ. विखे आ. खताळांना दिव्य पुष्पहार
निळवंडे उजवा कालव्याचे पाणी मालुंजे पाझर तलावात सोडण्यात आले. यामुळे परिसरातील शेतकर्यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ व भाजपचे उपाध्यक्ष, माजी सरपंच संदीप घुगे यांची सजविलेल्या वाहनातून ढोल- ताशांच्या गजरात गावातून वाजत- गाजत मिरवणूक काढली. क्रेनच्या साह्याने माजी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार अमोल खताळ यांना दिव्य पुष्पहार घालून, त्यांचा अनोखा सत्कार करण्यात आला.