

नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर गावात झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणाबाबत संपूर्ण अतिक्रमण हटविण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला होता.
सदर ग्रामसभेच्या ठरावाची प्रत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयाकडे देण्यात आली आहे. ग्रामसभेतील ठरावानंतर प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. (Latest Ahilyanagar News)
गेल्या अनेक वर्षांपासून जेऊर गावातील अतिक्रमणाचा विषय रेंगाळत पडला आहे. चर्चा, ठराव, निवेदने, नोटिसा यांचा खेळ वीस वर्षांपासून सुरू आहे. तरीदेखील अतिक्रमण हटत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.
सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून, येथील अतिक्रमण हटविण्यासाठी वर्षानुवर्ष ग्रामस्थ, तसेच ससेवाडी नागरिकांकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे येथील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढच होत गेल्याचे चित्र दिसून येते.
गेल्या 21 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत सीना नदी पात्रातील सर्व अतिक्रमणे हटविण्याबाबतचा ठराव अशोक मगर यांनी मांडला होता. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. तत्काळ अतिक्रमणे हटविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
जेऊर गावाला अतिक्रमाणांचा विळखा पडला असून, वाढत्या अतिक्रमणाचा त्रास पंचक्रोशीतील नागरिकांना विशेष करून ससेवाडी ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ससेवाडी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
जेऊर गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांनी देखील ग्रामपंचायतीला आदेश दिले होते. परंतु त्याकडे देखील ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच जेऊर गावामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा आरोप ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. ग्रामसभेतील ठराव जिल्हाधिकारी, तसेच तहसील कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आल्याने याबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सरसकट अतिक्रमण काढा
तब्बल वीस वर्षांपासून अतिक्रमण हटविण्याबाबतचा सुरू असलेला खेळ प्रशासनाने कारवाई करून थांबवावा. गाव अतिक्रमण मुक्त करून जेऊर गावचा श्वास मोकळा करावा. अतिक्रमण मोहीम गोरगरिबांना पुरती मर्यादित न राहता सरसकट अतिक्रमण काढण्याची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून होत आहे.
गावातील मुख्य बाजारपेठ सीना नदी पात्रात अतिक्रमणात वसली आहे. भविष्यात येथे महापुरामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गावात जाणारा मुख्य रस्ता, महावितरण कंपनी चौक ते सीना नदीपात्र रस्ता, वाघवाडी गावठाण, गावांतर्गत रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, बायजामाता डोंगर परिसर तसेच विविध शासकीय जागांवर झालेले अतिक्रमण हटविण्याची गरज आहे.
-अशोक मग