पारनेर: तालुक्यातील कळस येथे मंगळवारी (दि. 2) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील रानमळा रस्त्याला सुतार वस्तीजवळ घडली.
गणेश हे कळस गावाकडून रानमळ्याच्या रस्त्याने घरी येत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. रात्री आठपर्यंत गणेश घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गाडगे यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. (Latest Ahilyanagar News)
कळस परिसरात उसाचे प्रमाण जास्त असल्याने बिबट्यांचा वावर नेहमीच असतो. यापूर्वीही जनावरांवर बिबट्यांचे हल्ले झाले आहेत. परंतु मानवी जीवित हानीची ही पहिलीच घटना आहे. या हल्ल्यामुळे गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिकांनी वन विभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त, पिंजरे लावणे किंवा रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे यांसारख्या खबरदारीच्या उपायांची गरज व्यक्त केली जात आहे. वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला असून, परिसरात पिंजरे लावण्याचे नियोजन आहे. ग्रामस्थांनी रात्री एकट्याने बाहेर न पडण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.