Sugar Factory: साखर कारखान्यांचे काटे तपासणार; तहसीलदार, पोलिस निरीक्षकासह सहा सदस्यीय भरारी पथक

तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांचे पथक स्थापन; अचानक तपासणी करून अहवाल शासनाला पाठवणार
Sugar Factory
Sugar FactoryPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: ऊसदराची कोंडी अद्याप ‘अपेक्षित’ फुटलेली नसताना, साखर कारखान्यांकडून काटा मारला जात असल्याच्याही तक्रारी साखर आयुक्तांकडे गेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांच्या भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

हे पथक अचानक कारखान्यावर जाऊन वजनकाट्याची तपासणी करणार आहे. तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाकडेही पाठवला जाणार आहे.

जिल्ह्यात गाळप हंगामाला सुरूवात झाली आहे. कर्मवीर शंकरराव काळे कारखाना (आमदार आशुतोष काळे) वगळता अन्य एकाही कारखान्याने पहिली उचल जाहीर केलेली नाही. शेतकरी संघटना चार हजारांची पहिली उचल मागणीवर ठाम आहेत. तर अन्य काही संघटनांकडूनही पाच हजारांच्या दरासाठी प्रशासन अन् कारखानदारांसमवेत संषर्घ सुरू आहे.

Sugar Factory
Ahilyanagar Zilla Parishad Election: जिल्हा बँकेपाठोपाठ दिवाळीनंतर वाजणार मिनी मंत्रालयाचे फटाके!

दरम्यान, वजनकाट्यातही फसवणूक केली जात असल्याच्या साखर आयुक्तांकडे तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी कारखान्यांच्या वजनकाटे तपासणीसाठी उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र विभागाला भरारी पथकाच्या स्थापनेसाठी पत्र देण्यात आले होते.

त्यानुसार, महसूल, वैध मापनशास्त्र, पोलिस प्रशासन, प्रादेशिक सहसंचालक तसेच शेतकरी प्रतिनिधींचे भरारी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक गाळप हंगाम सुरू असताना केव्हाही दोन वेळा अचानक जाऊन वजनकाट्यांची पडताळणी करणार आहे.

Sugar Factory
Ahilyanagar Food Adulteration Raids: अहिल्यानगरमध्ये भेसळखोरांवर धाडी; सोयाबीन तेल, मसाल्याचा १० लाखांचा साठा जप्त!

दरम्यान, नेवासा लोकनेते घुले कारखान्याच्या वजनकाटा तपासणीसाठी तहसीलदार हे पथकप्रमुख, तर सदस्य सचिव हे आर. डी. दराडे यांच्यासह सहा सदस्य असणार आहे. यामध्ये स्थानिक तालुका पोलिस निरीक्षक यांचाही पथकात सहभाग असणार आहे.

अशाच पद्धतीने प्रसाद शुगर, अशोक, युटेक, अगस्ती, अंबालिका, जयश्रीराम, नागवडे, ओंकार शुगर, गौरी शुगर, श्री क्रांती शुगर, गंगामाई, कृषीनाथ ग्रीन एनर्जी आदीसह 22 कारखान्यांच्या वजन काट्यांच्या तपासणीसाठी तालुकानिहाय सहा सदस्यीय पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे पथक वजनकाट्याची तपासणी करणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

कुंपणच शेत खात आहे : अभिजीत पोटे

साखर कारखाने साखर उतारा तर चोरतातच; परंतु वजन मापे विभाग देखील वजनात काटामारी करण्यात कारखान्यांना मदत करतो, असा आमचा आरोप आहे, असे शिवसेनेचे शेतकरी नेते अभिजीत पोटे यांनी संगितले.

ते म्हणाले, की भरारी पथकाकडे वजन काटे तपासणारी साधनेच नाहीत. साखर कारखान्याचे वजन काटे तपासणाऱ्या भरारी पथकामध्ये एक तरी आयटी इंजिनिअर असावेत, वजन काटा ते वे- इंडिकेटर दरम्यान असणाऱ्या केबल नियमानुसार उघड्या असायला हव्यात, प्रत्यक्षात त्या गाडलेल्या असतात, तिथेच बायपास करून संगणकाद्वारे वजनामध्ये फेरफार केला जातो, अशी आमची शंका आहे.

याला पर्याय म्हणून कारखान्यांचे वजन काटे कायमस्वरूपी बंद करून प्रत्येक कारखान्याबाहेर शासकीय वजन काटे ऑनलाइन एसएमएस प्रणालीप्रमाणे सुरू करावे, अशी मागणी पोटे यांनी केली.

शेतकरी संघटनांसोबतच तपासणी होईल : दराडे

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार भरारी पथकांची स्थापना केली आहे. कारखान्यावर जाऊन वजनकाट्याचे स्कॅनिंग केले आहे. आता अचानक तपासणी करण्यावेळी शेतकरी संघटनांच्या संबंधित लोकांनाही सोबत घेतले जाईल.

तपासणीवेळी वजनकाटा झालेल्या गाड्यांचे पुन्हा वजन केले जाईल, तसेच कारखान्याच्या इतर वजनकाट्यावरही त्याच गाड्यांचे वजन करून तपासणी होईल. त्याचा अहवाल साखर आयुक्तांना दिला जाईल, अशी माहिती वैध मापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक तथा समितीचे सदस्य सचिव आर.डी. दराडे यांनी ‘पुढारी’ला दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.