

जामखेड: तालुक्यात या वर्षी कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात तब्बल 7 हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. वाढीव उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली; मात्र बाजारात भाव कोसळल्याने सर्व गणितच बिघडले आहे.
सरासरी हेक्टरी 15 ते 20 टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सततच्या पावसाचा मोठा फटका बसला. पिकावर रोगराई वाढल्याने वारंवार फवारणी करावी लागली. यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागले, पण बाजारात कांद्याला मिळणारा दर हा 10 ते 12 रु दरम्यान असल्याने उत्पादन खर्चाच्या बरोबर असल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही.
‘खत, बियाणे, मजुरी, फवारणी यावर प्रचंड खर्च झाला; पण बाजारात कांद्याला भावच नाही. कष्ट करूनही हातात काहीच राहत नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी तर कांदा विकण्यापेक्षा शेतात टाकून देणे स्वस्त पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीतच ठेवला आहे; पण ऊन व वातावरणातील बदलामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दरम्यान, प्रशासन आणि सरकारकडून कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे. हमीभाव जाहीर करणे, कांदा खरेदी केंद्रे सुरू करणे आणि नुकसानभरपाई देणे, अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत. तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे. कांद्याच्या दरघटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, कर्जबाजारीपणात आणखी भर पडत आहे.
कांद्याचा उत्पादन खर्च किलो मागे 10 रुपये आहे. सध्या 10 ते 12 रुपये किलोने चांगल्या प्रतीचा कांदा विकला जात आहे. त्यानंतर 2 नंबर कांदा 7 ते 9 रुपयांनी आणि 3 नंबर कांदा 6 ते 7 रुपये किलोने जात आहे. म्हणजे सरासरी भाव 10 रुपयांपर्यंत आहे. त्यात उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे हमीभाव मिळवा किंवा शेतकऱ्यांना किलोमागे 10 रु अनुदान मिळावे, अशी आमची मागणी आहे.
अशोक रोडे, प्रगतशील शेतकरी