

श्रीरामपूर: खा. गोविंदराव आदिक सांस्कृतिक सभागृहाच्या समोरील मोकळ्या जागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचा ऐतिहासिक निर्णय कालच्या पहिल्याच सभेत घेण्यात आला.यावेळी रिंग रोड, तलावात मैलामिश्रीत पाणी, आदी विषयावर साधक बाधक चर्चा होऊन अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. श्रीरामपूर नगरपालिकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्षा कांचन सानप, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, सर्व विभागाचे अधिकारी यांच्यासह अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे वगळता सर्व सदस्य उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा स्व. गोविंदराव आदिक सांस्कृतिक सभागृहाच्या आवारात बसविण्याबाबत चर्चा झाली. यावेळी श्रीनिवास बिहाणी, आकाश बेग, आशिष धनवटे, संजय गांगड, दीपक चव्हाण यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी शहरातील नागरिकांना ही जागा लांब पडते. ती गैरसोयीची असल्याने छत्रपती शिवाजी चौकात अथवा शहरात कुठेही हा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर नगराध्यक्ष ससाणे यांनी कायदेशीर बाबी लक्षात घेता ही जागा निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. त्यास गटनेते मुजफ्फर शेख, राजेंद्र पवार, अंजुम शेख, मंजुश्री मुरकुटे यांनी पाठिंबा दर्शविला, त्यानंतर सर्वानुमते या विषयास मंजुरी देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पुढाकार घेतला. तसेच शहराच्या विकासासाठी शेती महामंडळाच्या जागेसह विकास निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
मंजुश्री मुरकुटे यांनी शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभारण्याची सूचना केली. श्रीनिवास बिहाणी यांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने पूर्वीप्रमाणे पांजरपोळ उभारावे अशी सूचना मांडली.
नगरपरिषद हद्दीत अतिक्रमण कारवाईत विस्थापीत झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी नगराध्यक्ष ससाणे यांनी जवाहर कारखाना, उदय हॉटेल व पुनम हॉटेल परिसरातील जागेचा पर्याय सुचवला. अंजुम शेख, मुजफ्फर शेख यांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन आमदार, पालकमंत्री, नगरविकास मंत्री यांच्याकडे शिष्टमंडळ नेण्याची सूचना केली.
शहरातील पिण्याच्या पाण्याच्या तलावात थेट मैला मिश्रीत पाणी जात असल्याचे कुठेही आढळून आलेले नाही. जर असा प्रकार कोणी केला तर, पाठीशी घातले जाणार नाही, थेट कारवाई करू, असे आश्वासन नगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सर्वसाधारण सभेत दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा बसविणे, विस्थापित झालेल्याच्या पुनर्वसनाबाबत विषय, नमो उद्यान विकसित करणे, आदी विषय मंजूर करण्यात आले. यावेळी अंजुम शेख, मुजफ्फर शेख, राजेंद्र पवार, आकाश बेग, मंजुश्री मुरकुटे, दिलीप नागरे, जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे, स्नेहल खोरे, यांनी चर्चेत भाग घेतला.
सर्वांंनी सहकार्य करावे: नगराध्यक्ष ससाणे
आशिष धनवटे व बिहाणी यांनी जुना धागा पकडून, आपण शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच बसावा यासाठी आत्मक्लेश आंदोलन केले. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण आंदोलन केले. आता शिवछत्रपती शिवसृष्टी ज्या ठिकाणी बसविली ती योग्य आहे हे जाहीर करावे, असे धनवटे, बिहाणी व गांगड यांनी सांगितले. त्यावर याबाबत राजकारण करू नये छत्रपती संभाजी महाराजांची पुतळा बसविण्यास सहकार्य करावे, असे नगराध्यक्ष ससाणे यांनी सर्व सदस्यांना सांगितले.