

नगर: आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी व महिला सक्षमीकरण या माध्यमातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शासनाच्या योजना व बाजारपेठेच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा ‘कृषिपर्व’ हा उपक्रम शेतीच्या परिवर्तनाचा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला.
कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्स्पो इंडियन ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव रोडवरील नेमाने इस्टेट येथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव ‘कृषिपर्व’चे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, स्वामी विज्ञानानंद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उमेदचे व्यवस्थापक सोमनाथ जगताप आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, कृषी क्षेत्रात सातत्याने होत असलेले बदल व नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कृषिपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार होणारी उत्पादने दर्जेदार असून, कृषिपर्वसारख्या प्रदर्शनांमुळे महिलांच्या उत्पादनांना ओळख मिळून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. राहुरी येथील कृषी विद्यापीठातील जागेवर फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली असून, हा उद्योग जिल्ह्यात आल्यास फळपीक उत्पादकांना नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, की शेती क्षेत्रात होत असलेले बदल व नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख या कृषिपर्वातून होईल. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले.
या महोत्सवात आधुनिक कृषी अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया उद्योग तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या कार्यक्रमास शेतकरी, महिला बचत गटांच्या सदस्य, कृषी उद्योजक, कृषी तज्ज्ञ, नागरिक उपस्थित होते.
अजितदादादांच्या अपघाती मृत्यूचे राजकारण नको : विखे
अजितदादादा पवार यांचा अपघाती मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे याबाबत कोणत्याही प्रकारचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहन विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. अपघाताचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही. प्राथमिक माहितीवर घाईगडबडीने मत व्यक्त करणे चांगले नाही. परंतु काही मंडळींनी राजकारण सुरू केले आहे. त्यांनी विनाकारण राजकारण करू नये, असे विखे पाटील म्हणाले. महापौरपदाची निवड स्थानिक पातळीवर सर्वांच्या संमतीने झालेली आहे. यासाठी बाहेरच्या लोकांच्या संमतीची आवश्यकता नाही. असा टोला त्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना लगावला. हाके यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन येथील वक्तव्य केल्याबाबत प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले, ओबीसी-कुणबी असा कोणताही वाद नाही. काही लोकांनी याचा व्यवसाय केला आहे.
शेतकरी, विद्यार्थ्यांच्या सहली काढा
जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शेतकरी व कृषी विद्यापीठातील विद्यार्थी यांना देशभरात कृषी क्षेत्रात होत असलेले बदल अभ्यासण्यासाठी सहलींचे आयोजन करा, असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले. यावेळी त्यांच्या हस्ते महिला शेतकरी पुरस्कार, उमेद अभियानातील पुरस्कारार्थी, शासकीय रुग्णालय व क्रीडा पुरस्कार तसेच शेतकऱ्यांना विहिर अनुदानाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या व्हॉट्सॲप चॅटबॉटचा शुभारंभही करण्यात आला.