

श्रीरामपूर: भोंग्यासदंर्भातील निवेदन प्रशासनाला दिल्यानंतर गिरमे चौकात चहा दुकानाबाहेर गोळीबार झाल्याचा थरार श्रीरामपूरकरांनी अनुभवला. पोलिसांत यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असून हल्लेखोर मात्र पसार होण्यात यशस्वी झाला.
हुजेफा अनीस शेख (रा. वार्ड नंबर 2) असे गोळीबार करणार्या आरोपीचे नाव आहे. त्याने संघर्ष बाळासाहेब दिघे यांच्यावर गोळ्या झाडल्या, पण सुदैवाने ते बचावले. त्यांनीच पोलिसांत फिर्याद दिली आहे. (Latest Ahilyanagar News)
धार्मिक स्थळावरील भोंग्यासदंर्भात संघर्ष दिघे, सागर बेग, आकाश बेग, रोहित दिनकर यादव व राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी श्रीरामपूरातील डीवायएसपी कार्यालयात गेले होेते. तेथून ते शिवाजी रोडवरील गिरमे चौकातील चायवाला दुकानावर चहा घेण्यासाठी थांबले. संघर्ष दिघे यांच्या ओळखीचा सोनू राठोड तेथे आला.
त्याने इशारा करुन संघर्षला जवळ बोलविले. हे बोलत असताना हुजेफा अनीस शेख तेथे आला. त्याने संघर्षकडे पाहुन कमरेचा पिस्तूल काढून लोड करण्याचा प्रयत्न केला. ते पाहून घाबरलेल्या संघर्षने त्याला धक्का देत खाली पाडण्याचा प्रयत्न केला.
त्या झटापटीत हुजेफा बाजूच्या एचडीएफसी बँक एटीएमजवळील बोळीतून पळाला. संघर्ष दिघे व तुषार कुर्हे त्याचा पाठलागासाठी पळाले. पळत असतानाच पाठीमागे पाहून हुजेफाने संघर्षच्या दिशेने दोनदा गोळ्या झाडल्या. गोळी वाचवत संघर्ष पाठलाग करत होता, मात्र सैलानी बाबा दर्गाकडून हुजेफा नजर चुकवत पसार झाला.
संघर्ष बाळासाहेब दिघे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात हुजेफा अनीस शेख विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109 सह आर्म अ्क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचे वरातीमागून घोडे; आमदार संतापले
माझ्यासमोरून हातात पिस्तूल घेवून पळणारे तरूण मी पाहिले. ते पाहून अंगावर काटा आला. पण पोलिस मात्र हातावर हात बांधून बसले. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अपयश आले असून गुन्हेगारांसोबत पोलिसही सामील झाल्याचा खळबळजनक आरोप आ. हेमंत ओगले यांनी केला. भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिस नेहमीप्रमाणे तीन तासांनी पोहचल्याने आ. ओगले यांनी नाराजी व्यक्त केली.
अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपाधीक्षक जयदत्त पवार, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख घटनास्थळाची पाहणी करत असताना आ. ओगले तेथे पोहचले. दुपारी 1 वाजेच्या सुमारास गोळीबार झाला. पोलिस मात्र दुपारी चार वाजता तेथे पोहचले. श्रीरामपुरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत.
सांगूनही काहीच परिणाम होत नाही. माझ्या कार्यालयातून उड्या मारून समोर शहराच्या गल्ल्यांमधून युवक पिस्तूल घेऊन धावतानाचा प्रसंग पाहून अंगावर काटा उभा राहतोय, अशा शब्दांत भावना व्यक्त करताना पोलिस मात्र हातावर हात धरून बसले आहेत. या घटनांना पोलिसच जबाबदार आहेत. गुन्हेगारांबरोबर पोलिसही सामील असल्याचा आरोप आ.ओगले यांनी केला.
ज्यांना पोलिसांनी पकडायला हवे त्यांना सोडून दुसर्यानांच पकडले. खरे गुन्हेगार तेथेच बसून होते. हातात पिस्तूल असणारे दोघे आमदारांच्या कार्यालयातून उड्या मारून पळताना पाहिल्याचे सांगत नागरिक रस्त्यावर उतरले तर त्यांनाही अडवू नका, गँगवारच्या टोळ्या तडीपार करा अशी मागणी आ. ओगले यांनी यावेळी केली. शहरातील गँगवारचा बंदोबस्त करा, आता शांत बसणार नाही, असा इशाराही आ. ओगले यांनी दिला.