

श्रीगोंदा: कर्जमाफी जाहीर करू असा आमचा शब्द आहे. यापूर्वी दोनदा कर्जमाफी दिली. कर्जमाफीपासून आम्ही बाजूला गेलो नाही, त्यावर कमिटी काम करत आहे, योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे शेतकरी मेळाव्यात दिले.
शहरातील संत श्री शेख महमद महाराज प्रांगणात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगरचे आमदार संग्राम जगताप होते. आ. काशिनाथ दाते, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, सभापती बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार, भगवान पाचपुते, रमेश थोरात, राजेंद्र गुंड, अर्चना पानसरे, संध्या सोनवणे, वैशाली नागवडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
या सर्व नेत्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, की इथून मागे झाले ते झाले. आता तुम्ही सगळे एकत्र आला आहात. उद्याच्या सर्व निवडणुका ताकदीने लढा. हलक्या कानाचे राहू नका. एकोप्याने राहून आपली ताकद वाढवा. माझ्याकडून तुम्हाला जे सहकार्य लागेल ते करीन.
एकत्र बसून मार्ग काढावा
कुकडी प्रकल्पात सर्वांत जास्त सिंचन श्रीगोंद्याचे आहे. डिंभे - माणिकडोह बोगद्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या बोगद्याविषयी मत मतांतरे आहेत. आंबेगाव, श्रीगोंदा तालुक्यातील लोकांनी एकत्र बसून मार्ग काढावा लागेल. आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांची शेती पाण्यात गेली, तेव्हा कुठे धरणे झाली अन् तुम्हाला पाणी आले, अशी आठवण करून द्यायला अजित पवार विसरले नाहीत.
संभाजी ब्रिगेडने दाखविले कांदे
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच श्रोत्यांमध्ये बसलेले संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे उभे राहिले आणि म्हणाले, की ‘दादा कांद्याच्या दराबाबत भूमिका मांडा.’ त्यावर पवार म्हणाले, की ‘माझे बोलणे झाल्यावर तुझी भूमिका मांड.’ नंतर मेळावा संपल्यावर पवार नेते-कार्यकर्त्यांसोबत वाहनाकडे जात असताना कापसे यांच्यासह नाना शिंदे यांनी त्यांच्या हातातील कांद्याची माळ फिरवून दाखवली.
स्थानिक नेते म्हणाले
घनश्याम शेलार: अधिकार्यांनी इतर कुणाची कामे करायची नाहीत असा फतवा तालुक्याच्या आमदारांनी काढला आहे. ही हुकूमशाही आम्ही मोडून काढू.
अण्णासाहेब शेलार: हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र आलो आहोत. एका ताटात जेवायला बसलोय. घास मोजू नका. फक्त दोन दादा, तुम्ही मोठे घास घेऊ नका.
राजेंद्र नागवडे: यापूर्वी जे झाले ते झाले. अजित पवार यांचा निर्णय आम्हाला मान्य राहणार आहे. राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार.
राहुल जगताप: तालुक्याचे आमदार बनावट पनीर, गुटखा यावर आवाज उठवत आहेत. काष्टीत बनावट दूध उत्पादन होत होते त्याचीही चौकशी झाली पाहिजे.
स्थानिक प्रश्नांवर पवार म्हणाले...
सहकारी साखर कारखाने टिकले पाहिजेत. कुकडी कारखाना शेतकर्यांची कामधेनू आहे. या कारखान्याला मदत करणार.
संत शेख महमद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे. स्थानिक वाद मिटवा. मी शक्य तेवढी मदत करतो.
निमगाव खलू येथे प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. प्रदूषण होणार असेल तर आम्ही परवानगी देणार नाही.