

श्रीरामपूरः होवू घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महायुतीला जोरदार धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या काही नगरसेवकांसह थेट शहराध्यक्षांनी काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. ज्येष्ठ नगरसेवक शामलिंग शिंदे, गटनेते राजेंद्र पवार, रईस जहागिरदार, राष्ट्रवादी शहर काँग्रेस फादर बॉडीचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, नगरसेविका प्रणिती दीपक चव्हाण, 'मर्चेंट'चे संचालक दत्तात्रय धालपे, योगेश जाधव, निलेश बोरावके यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. (Latest Ahilyanagar News)
यावेळी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, सभापती सुधीर नवले, अंजुमभाई शेख, मुज्जफर शेख, मुत्रा पठाण, रितेश रोटे, कलीम कुरेशी, के.सी. शेळके, निलेश नागले, रज्जक पठाण, नाजिरभाई व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार हेमंत ओगले यांनी, यावेळी काँग्रेस पक्षात आलेल्यांचे स्वागत केले. येत्या काळात स्व. ससाणेंप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन काम करु, असे आश्वासन त्यांनी दिले. करण ससाणे म्हणाले की, सर्वांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला. याबद्दल आभारी आहे. येत्या काळात बरोबरीने काम करु, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष गुजर म्हणाले की, हे प्रवेश शुभ शकुन आहे. श्रीरामपुरची विस्कटलेली घडी बसविण्याकरिता यासर्व सहकाऱ्यांचा फायदा होणार आहे. श्रीरामपुरातील गुंडगिरी व नशेखोरी संपविणे हा या निवडणुकीतील मुख्य अजेंडा आहे, असे गुजर म्हणाले. आभार राजेंद्र पवार यांनी मानले. यावेळी कार्यकर्त्यांनीही कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
श्रीरामपूर नगरपरिषदेवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार!
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, श्रीरामपूरची जनता स्वाभिमानी आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार आहे. स्व. जयंतराव ससाणे यांच्या कार्यकाळात श्रीरामपूर नगर परिषदेचा नावलौकिक राज्यभर होता. मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. तो काळ श्रीरामपूरसाठी सुवर्णकाळ होता, परंतू काही विघ्नसंतोषी लोकांना ते देखवले नाही.
त्यांनी श्रीरामपूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतू विधानसभा निवडणूकवेळी श्रीरामपुरकरांनी आमदार हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून, त्यांना मोठा धडा शिकवला. त्याचप्रमाणे आता येत्या निवडणुकीत श्रीरामपूर नगर परिषदेवर कॉंग्रेसचाच झेंडा फडकेल. मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.