

नगर : महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत शहराचेे आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः रस्त्यावर उतरून सहभाग घेतला. इतकेच नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करत कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करवून घेतली. नागरिकांनीही स्वतः स्वच्छता बाळगली, तर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यास हातभार लागेल, असे आवाहन त्यांनी केले.(Latest Ahilyanagar News)
महापालिकेतर्फे दररोज सकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत सक्कर चौक ते कोठी रोड परिसरात सोमवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आ. जगताप सकाळी 7 वाजल्यापासून उपस्थित होते. या मोहिमेच्या प्रारंभावेळी आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, उपयुक्त संतोष टेगळे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, विपुल शेटीया, कमलेश भंडारी, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, घनकचरा प्रमुख अशोक साबळे, विशाल पवार, मळू गाडळकर, तात्या दरेकर, गोरख पडोळे आदी मान्यवर आणि अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोपर्यंत नगर स्वच्छ आणि सुंदर होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे स्पष्ट करत आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहर स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाने जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपला घर परिसर स्वच्छ ठेवला, तर आपले शहरही स्वच्छ राहील. घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा. शहरात 15 कॉम्पॅक्टर कार्यरत आहेत, त्यामुळे रस्त्यावर कचरा दिसता कामा नये.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, महानगरपालिका दररोज शहरात स्वच्छतेचे काम करत असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. स्वच्छता मोहीम ही लोकचळवळ बनली पाहिजे.
माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी सांगितले की, नागरिकांनीही आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या वेळी शक्कर चौकातील रस्त्यामधील दुभाजकांच्या कडेला व खालील माती व कचरा साफ करण्यात आला. तसेच बंद गटारीचे चेंबर उघडून त्यातील गाळ, माती, मोठे दगडं काढून स्वच्छता करण्यात आली. रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे, गावात काढून अतिक्रमणे व टपऱ्याही काढण्यात आल्या. या विशेष अभियानामुळे शक्कर चौक ते कोठला रोड परिसर स्वच्छ व चकाचक झाल्याने परिसरातील नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले.