

देवदैठण: श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट आणि गणांच्या प्रारूप रचनेनंतर माजी आ. राहुल जगताप हे उमेदवारीबाबत राजकीय गुगली टाकताना येळपणे गटात नवीन चेहर्याला संधी देण्याचे संकेत दिसत आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक तीन वर्षांपासून लांबणीवर पडल्याने इच्छुकांचा पुरता हिरमोड झाला आहे. जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीच्या बारा गणांची प्रारूप रचना नुकतीच जाहीर झाली. त्यात तालुक्यातील सन 2017ची रचना जैसे थे राहिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या नजरा आता आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत.
सद्यःस्थितीत आ. विक्रम पाचपुते (भाजप), माजी आ. राहुल जगताप व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे (दोघे राष्ट्रवादी) हे तीनही प्रमुख नेते सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रमुख मैत्रीपूर्ण लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
आरक्षणाची प्रतीक्षा संपली असली, तरी उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे. येळपणे गटातून राष्ट्रवादीतर्फे डॉ. प्रणोती जगताप यांच्या उमेदवारीला मतदारांतून पसंती आहे. मात्र, माजी आ. राहुल जगताप ऐनवेळी राजकीय खेळी खेळताना नवीन चेहर्याला संधी देताना शिरूर नगरपालिका बांधकाम समितीचे सभापती अभिजित पाचर्णे यांचे नाव पुढे करू शकतात. कारण पाचर्णे यांचे श्रीगोंद्यासह येळपणे गटात नातेसंबंध आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने असल्याने ही उमेदवारी पॉवरफुल समजली जाते.
तसेच येळपणे गटात राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याने आ. जगताप ही राजकीय गुगली टाकण्याची शक्यता आहे.
अभिजित पाचर्णे यांचे सासरे सुभाष जगताप हे थेऊर (पुणे) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, तर सासू कल्पना जगताप लोणीकंद (पुणे) जिल्हा परिषद गटाच्या सदस्या आहेत. तसेच त्यांचे मामा प्रकाश जगताप आशिया खंडातील एक नंबरची मानली जाणारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. उद्योगपती प्रकाश धाडीवाल यांचे ते निकटवर्तीय असून, त्यांचे माजी आ. राहुल जगतात यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत.