

नगर : जिल्ह्यात झालेल्या सुरुवातीच्या पावसाने धरणे बर्यापैकी भरलेली आहेत. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यावर दुबार पेरणीचे संकट दिसत असल्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात किती पाऊस होईल याचा अंदाज हवामान खात्याशी चर्चा करुन घेतला जाईल. त्या निर्णयावरच धरणांतील आवर्तनाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, शनिशिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात सविस्तर बोलले आहेत. याबाबत चौकशी सुरू झाली असून, यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई तर होईलच. परंतु त्यांना शनिमहाराजांचा प्रक्षोभ आणि चमत्कार देखील अनुभवाला मिळेल असेही त्यांनी म्हटले.
जिल्ह्यातून अनेकांची बदली झाली. अनेकजण नवीन दाखल झाले आहेत. विविध योजनांची आणि कार्यक्रमांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी बुधवारी (दि.23) विविध विभागांच्या अधिकार्यांची बैठक आयोजित केली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणे भरतील की नाही अशी चिंताजनक परिस्थिती होती. परंतु पाऊस झाल्यामुळे धरणे बर्यापैकी भरले गेले आहेत. परंतु गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप पिकांची परिस्थिती चिंताजनक असून, शेतकर्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असल्याची परिस्थिती आहे.
या परिस्थितीत आगामी काळात किती पाऊस होईल याची माहिती हवामान खात्याच्या अधिकार्यांशी चर्चा करून घेतली जाईल. त्यांच्या निर्णयाचा अंदाज लक्षात घेऊनच भविष्यात धरणांतून शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. या सध्याच्या परिस्थितीवर प्रशासनाला लक्ष ठेवण्याचे निर्देशदेखील दिल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
शनिदेवस्थानातील नोकरभरती आणि बनावट अॅपबाबत अनेक गंभीर आरोप असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन काळात सभागृहात सविस्तर बोलले आहेतच. याबाबत शनी संस्थानचे विश्वस्त मंडळ, अधिकारी आणि कर्मचार्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीत जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होणारच आहे. मात्र, हे देवस्थान जागृत आहे. शनिमहाराजांच्या तिजोरीत ज्यांनी हात घातला, त्यांना शनिमहाराजांचा प्रक्षोभ आणि चमत्कार अनुभवण्यास मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशन काळात विधानसभेत रम्मी खेळत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. याकडे पालकमंत्री विखे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, कृषीमंत्री कोकाटे यांनी याबाबत खुलासा केलेला आहे. आमदार रोहित पवार यांनी इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःचा पक्ष आधी सांभाळावा, अशी टीका केली. कृषीमंत्री कोकाटे यांचा राजीनामा आणि इतर काही घटनांबाबत त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही त्यांनी म्हटले.
विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज व महायुती सरकारने घेतलेले निर्णयायाने जनतेचा महायुतीवरील विश्वास कायम आहे. उलट तो दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला असल्याचे पालकमंत्री विखे पाटील म्हणाले. विरोधकांकडे अजेंडाच नव्हता. महायुती सरकारच्या वाढत्या यशापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांनी आरोप केल्याचे त्यांनी म्हटले.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्यक्तिमत्व दिलखुलास आहे. त्यांच्या मनात काहीही नसते. ते साफ मनाचे आहेत. असे असले तरी, त्यांनी माध्यमाच्या युगात आणि सार्वजनिक जीवनात मर्यादितच बोलले पाहिजे. याबाबत मी त्यांना सल्ला दिला आहे. परंतु कधी तरी त्यांना उत्साह अनावर होतो, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी म्हटले.