Shrigonda Hotel Prostitution Raid: काष्टीतील आम्रपाली हॉटेलवर छापा; ७ महिलांची सुटका, ४ जण अटकेत
श्रीगोंदा: तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बारवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अहिल्यानगर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी (दि. 13) रात्री छापा टाकला. या कारवाईत 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, हॉटेल मॅनेजरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रणजित राम पुजारी (वय 30, रा. कर्नाटक, सध्या रा. हॉटेल आम्रपाली, काष्टी मॅनेजर), मकेशकुमार गुरुदयाल यादव (वय 26, रा. गया, बिहार), नागनाथ लक्ष्मण इंगळे (वय 32, रा. निलंगा, जि. लातूर), ज्ञानेश्वर रमेश मुळीक (वय 35, रा. शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अहिल्यानगर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काष्टी येथील आम्रपाली हॉटेलमध्ये महिलांना डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पंचांसमक्ष डमी ग्राहक पाठवून सापळा रचला.
शुक्रवारी रात्री 8.15 च्या सुमारास डमी ग्राहकाने इशारा करताच पोलिस पथकाने हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर छापा टाकला. यावेळी तेथे पाच खोल्यांमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून विविध कंपन्यांचे 3 महागडे मोबाईल, रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह साहित्य. असा 22 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या छाप्यात पुणे, मुंबई, ठाणे आणि पश्चिम बंगाल येथील 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांनी पोलिसांना सांगितले की, हॉटेल मालक आणि मॅनेजर पैशांचे आमिष दाखवून, राहण्याची सोय करून ग्राहकांकडून पैसे घेत होते आणि त्यांच्याकडून बळजबरीने देहविक्री करून घेत असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहायक फौजदार शेख शकील अहमद, महिला पोलिस हवालदार अनिता पवार, छाया राधवन आणि पोलिस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
श्रीगोंदा पोलिसांचा कानाडोळा
महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या काष्टी गावात राजरोस पोलिस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून वेश्या व्यवसाय सुरू होता.स्थानिकांनी अनेक वेळा याबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्यांनी कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही. एक प्रकारे या व्यवसायाला यंत्रणेचे अभय मिळाले होते. नगरच्या पोलिस पथकाने जी कारवाई केली. कारवाई न करण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांवर काही दबाव होता का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोपीकडे हॉटेल चालविण्यासाठी कसे आले , हॉटेल मालक आणि आरोपी यांच्यात काही करारनामा झाला होता का.या बाबी तपासून हॉटेल मुळ मालकास आरोपी करायचे किंवा नाही हे तपासात निष्पन्न होईल. त्यानुसार पुढील कारवाई करणार आहोत.
सोपान शिरसाठ, प्रभारी पोलिस निरीक्षक, श्रीगोंदा

