

आश्वी: पोलिस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगून निघालेल्या जिद्दी तरुणावर वाटेतच काळाने घाला घातला. पुणे येथे पोलीस भरतीसाठी जात असताना नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील साईकीरण भागवत शेलार (वय 25) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपरी निर्मळ गावावर शोककळा पसरली आहे.
पिंपरी निर्मळ येथील साईकीरण शेलार हा मित्रासह शुक्रवारी दुचाकीवरून पुणे येथे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेसाठी निघाला होता. प्रवासादरम्यान, नारायणगाव हायवेवरील चौदा नंबर परिसरात भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात साईकिरणचा जागीच मृत्यू झाला.
तो पिंपरी निर्मळ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे लिपिक भागवत शेलार यांचा मुलगा होता. अत्यंत मनमिळावू, कष्टाळू आणि गावात सर्वांशी आपुलकीने वागणारा तरुण म्हणून तो परिचित होता. घराची परिस्थिती सावरण्यासाठी आणि आई-वडिलांचे नाव रोशन करण्यासाठी तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस भरतीची तयारी करत होता.
मात्र, भरती स्थळावर पोहोचण्यापूर्वीच वाटेत झालेल्या अपघाताने त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे स्वप्न धुळीस मिळाले. शनिवारी सकाळी साईकीरणचे पार्थिव पिंपरी निर्मळ येथे आणण्यात आले.
यावेळी संपूर्ण गाव सुन्न झाले होते. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, धाकटा भाऊ आणि चुलते असा परिवार आहे. साईकीरणच्या जाण्याने शेलार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.