

श्रीगोंदा: तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. 5) मध्यरात्री छापा टाकत विमानाच्या इंधनाची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन जणांना अटक करून 88 लाख 58 हजार 770 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत पेट्रालिंग करीत असताना, गव्हाणवाडी येथे हॉटेल महाराजाच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये विमान इंधनाचा अवैध साठा करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या उपस्थितीत पथकाने छापा टाकला.
त्या वेळी तेथे इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरमधून (एमएच 04 एलक्यू 6885) मधून तीन जण ड्रममध्ये इंधन काढताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. मुकेश रामअकबाल सिंग (वय 26), रामभवन रामतिरथ राजपूत (वय 32, दोघे रा. उत्तर प्रदेश), चंदू शिवराम जांभळकर (वय 41, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) अशी त्यांची नावे आहेत. टँकरचे सील तोडून त्यातून वाहतूक केले जात असलेले विमानाचे इंधन चोरून विक्रीसाठी साठवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हरीश भीमसिंग (रा.पिंपरी, पुणे) व इतर साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. वरील आरोपीच्या ताब्यातून 40 हजार लिटर इंधन, टँकर, ड्रम असा एकूण 88 लाख 58 हजार 770 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सुयोग सुपेकर, दीपक घाटकर, संतोष खैर, गणेश धोत्रे, चालक उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.