Parner Politics: ‘स्थानिक’च्या निवडणुकीत तालुक्यात भगवा फडकणार; शिवसेना (उबाठा) पक्षाचा निर्धार
पारनेर: येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कंबर कसली असून, निवडणुकीत तालुक्यात भगवा फडकवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
सुपे येथे नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या सत्कार समारंभात पक्षाने आक्रमक पवित्रा घेत निवडणुकीत ताकदीनिशी उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पक्षाचा आवाज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून निवडणुकीत विजय मिळवण्याचे आवाहन केले. (Latest Ahilyanagar News)
या वेळी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, डॉ. भास्कर शिरोळे, युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, बाजार समितीचे उपसभापती किसनराव सुपेकर, गुलाबराव नवले, पारनेर शहरप्रमुख निलेश खोडदे, महिला आघाडीप्रमुख प्रियंका खिलारी, पंचायत समिती सदस्य पोपटराव चौधरी, बाबा रेपाळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख गाडे यांनी, पक्षाला बळकटी देण्यासाठी एकजुटीने काम करायचे असून, निवडणुकीमध्ये आपल्याला मोठे यश मिळवायचे आहे असे सांगितले. तालुकाप्रमुख डॉ. पठारे यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांवर ठाम राहून कार्य करण्याचा सल्ला दिला. उपस्थित शिवसैनिकांनी पक्षनिष्ठेचा गौरव करत निवडणुकीत विजयाचा संकल्प केला.
तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक घरात शिवसैनिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांच्या भूमिकेला न्याय देऊन तालुक्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत.
-डॉ. श्रीकांत पठारे, तालुकाप्रमुख, शिवसेना उबाठा पक्ष

