

जवळा: कोसळलेले बाजारभाव, कांदाविरोधी सरकारी धोरण, त्यात वाढत्या अस्मानी संकटाबरोबरच प्रतिकूल हवामानात कांदा सडण्याचे वाढते प्रमाण, यामुळे यंदा शेतकर्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून पडताना दिसत आहे. अशा संकटात सरकारने शेतकर्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्यांमधून होत आहे.
पारनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये गतवर्षी कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. हजारो टन साठवलेला कांदा गेल्या दोन तीन महिन्यांपासून चाळीत पडून आहे. परंतु मेच्या सुरुवातीलाच झालेल्या बेमोसमी पावसाने शेतातच खराब झाला कांद्याचे नुकसान, तर झालेच. (Latest Ahilyanagar News)
त्यातून उरलेला कांदा शेतकर्यांनी पुढे तरी बाजारभाव मिळेल, या आशेने आणखी खर्च करीत चाळीत साठवून ठेवला आहे. कांद्याचे पैसे होतील व कुटुंबाचा उदर निर्वाह चांगल्या पद्धतीने होईल. बँका, पतसंस्था व दुकानदारांची आर्थिक देणी देता येतील, कर्ज मिटवता येईल, मुलांचे शिक्षण, आरोग्य, लग्नसोहळे, इतर खर्चाचे ताळमेळ बसतील या आशेवर यंदा जवळजवळ सत्तर टक्के शेतकर्यांनी कांदा साठविण्याचा निर्णय घेतला.
परंतु या खेपेस मात्र शेतकर्यांचा पुरता हिरमोड झाला. बदलते हवामान, पावसाामुळे कांद्याला काजळी येऊन तो आता काही अंशी चाळीतच सडू लागला आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील शेतकर्यावर मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. कारण तालुक्यातील शेतकर्यांनी मोठा खर्च करून कांद्याची साठवणूक केली आहे.
परंतु बाजारभाव नसल्याने कांदा विकताी येईना. प्रतिकूल हवामानामुळे कांदा आता सडू लागला आहे. त्यामुळे तो आता चाळीत ठेवताही येईना, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
बाजारभाव घसरल्याने यंदा कांदाविक्रीतून खर्चही वसूल येईल असे वाटत नाही. कारण एकरी कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च व कांदा वजनातील घटीमुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याची आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकाटातून शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
- काशिनाथ रासकर, जवळा, ता. पारनेर