

गत पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रसचे दोघे निवडून आलेल्या वार्डाचे नव्या रचनेत त्रिभाजन करण्यात आले आहे. नव्याने जोडलेला भाग आणि माजी नगरसेवक पाहता महायुतीचे पारडे तेथे जड दिसण्याची चिन्हे आहेत. मात्र तरीही तेथील अस्तित्व टिकविण्यासाठी ठाकरेंची शिवसेना व राष्ट्रवादी जोर लावणार हेही खरे. राखीव जागेसाठी आरक्षण निघणे बाकी असल्याने त्यानंतरच निवडणुकीचा आखाडा खऱ्या अर्थाने रंगणार आहे.
शीला दीप चव्हाण, सुप्रिया धनंजय जाधव हे दोन काँग्रेसचे, तर मालनताई ढोणे (भाजप) आणि अनिता राजेंद्र राठोड (राष्ट्रवादी) असे चौघे या वार्डाचे प्रतिनिधीत्व करत होते. म्हणजे ढोणे सोडल्या तर तिघे महाविकास आघाडीकडून विजयी झाले होते. यातील धनंजय जाधव हे आता भाजपात गेले आहेत. त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपचे बळ वाढले आहे. (Latest Ahilyanagar News)
संजय ढोणे व धनंजय जाधव ही जोडी या वार्डात भाजपचे कमळ फुलवतील, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. गतवेळी बसपाच्या हत्तीवर स्वार झालेले सचिन जाधव आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. महायुतीतील घटकपक्ष म्हणून जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. सचिन जाधव, संजय ढोणे व धनंजय जाधव या त्रिकुटामुळे महायुतीचे पारडे जड दिसणार असे चित्र आहे.
दीप चव्हाण हे गतवेळी व आताही काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे ते महायुती विरोधात उमेदवारांची मोट नक्कीच बांधतील. नव्या रचनेत या वार्डाला मंगलगेट, हवेली व झेंडगेटचा भाग नव्याने जोडला आहे. झेंडीगेट भागातून कायम नगरसेवक असलेले नज्जू पहिलवान याच वार्डातून ‘तुतारी’ फुंकण्याची चिन्हे आहेत.
झेंडीगेट, मंगलगेट व हवेलीतील मुस्लिम समाजाची संख्या पाहता आणखी काही इच्छुकांची नावे समोर येणार आहेत. त्याचबरोबर स्व. अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड व गौरव ढोणे यांचीही नावे या वार्डातून महाविकास आघाडीकडून चर्चेत आली आहेत.
गतवेळी वार्डातील एक जागा अनुसूचित जाती (महिला) राखीव होती. आताची लोकसंख्या पाहता पुन्हा आरक्षण पडेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे एका जागेवर महायुती व महाविकास आघाडीला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.
नवीन प्रारूप प्रभाग रचना करताना सिद्धार्थनगर, नीलक्रांती चौक, पोलिस मुख्यालय, खाकीदास बाबा मठ तोडून झेंडीगेट, मंगलगेट, हवेेली, महावीरनगर, बेलदार गल्ली, कवडेनगर, वंजार गल्ली हा भाग जोडून नवा दहा नंबर वार्ड निर्मिती करण्यात आली आहे. नव्या वार्डातील रचना पाहता महायुतीतील सचिन जाधव, धनंजय जाधव व संजय ढोणे यांचे प्राबल्य असलेल्या भागाचा समावेश असल्याने त्यांच्यासाठी ‘फिलगुड’ वातावरण असल्याचे मानले जाते. महाविकास आघाडीला मात्र ‘कॉँटे की टक्कर’ द्यावी लागेल, असे चित्र आहे.
दीपचाचांची पाचमध्ये उडी!
माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांचा जुन्या वार्डातील बहुतांश भाग हा पाच नंबर वार्डाला जोडला गेला आहे. तसेच तेथील लोकसंख्या पाहता तेथेही आरक्षण निघण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने त्यांनी पाच नंबर वार्डातून तयारी चालविली आहे. दहा नंबर वार्डातून ते नवा चेहरा देण्याची तयारी करत आहेत. गोगादेव मंदिर परिसरातील काहींनी राखीव जागेसाठी त्यांच्याशी संपर्कही साधण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.
छिंदम पुन्हा मैदानात?
2014 च्या निवडणुकीत विजयी झालेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक उद्गार काढणारे श्रीपाद छिंदम यावेळी पुन्हा निवडणूक मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. यावेळी मात्र ते स्वत: नसतील तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढणार असेही बोलले जाते. महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर झालेल्या निवडणुकीत श्रीपाद छिंदम यांचा आश्चर्यकारक झालेला विजय पाहता छिंदम यांची अपक्ष उमेदवारी महायुती व महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकते, असे बोलले जाते.