

नगर तालुका: नगर तालुक्यात बहुतांशी भागात बाजरी पिकाच्या सोंगणीची लगबग सुरू झाली आहे. संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरी उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. मजुरांअभावी बाजरी सोंगणीचे काम लांबणीवर पडत आहे. अद्याप तालुक्यात अनेक भागात रब्बी पिकांसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
तालुक्यात खरीप हंगामात सुमारे साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी पिकांची पेरणी करण्यात आली होती. जूनच्या सुरुवातीलाच तालुक्यातील बाराही महसूल मंडळामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला होता. (Latest Ahilyanagar News)
दक्षिण पट्ट्यातील वाळकी, खडकी, सारोळा कासार, भोरवाडी, अकोळनेर या पट्ट्यात मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मान्सून पूर्व पावसातच नद्यांना आलेल्या महापुरामुळे हाहाकार उडाला होता. अनेक वर्षांनंतर मान्सून पूर्व पावसाने दक्षिण पट्ट्यातील सर्व बंधारे, नाले, तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते.
मान्सूनपूर्व तसेच जूनच्या सुरुवातीलाच झालेल्या कमी अधिक प्रमाणातील पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी उरकून घेतली होती. परंतु खरीप पिकांची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने मूग, सोयाबीन व इतर पिकांना पाण्याचा ताण पडल्याने उत्पादनाला फटका बसला आहे.
बाजरीचे पीक जोमदार दिसून येत असले तरी संततधार सुरू असलेल्या पावसामुळे बाजरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. बहुतांशी भागातील बाजरीचे पीक काढणीला आले आहे. परंतु मजूर मिळत नसल्याने बाजरी सोंगण्याचे काम लांबणीवर जात आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी शेतात कणसे काटून वाळण्यासाठी ठेवली आहेत. परंतु पावसाचा लपंडावामुळे शेतकरी हैराण झाला आहे. संततधार पाऊस लागून राहिला तर बाजरीचे उत्पादन हाती येणार नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील बारा महसूल मंडळामधील अनेक मंडळांमध्ये अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जेऊर पट्ट्यात देखील पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. अद्याप या परिसरातील तलाव, बंधारे कोरडेठाक आहेत. मागील आठवड्यात ससेवाडी भागात झालेल्या पावसामुळे सीनामाई वाहती झाली असली, तरी पिंपळगाव तलावात चालू वर्षी नवीन पाण्याची आवक झालेलीच नाही. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, गावरान कांदा, हरभरा व इतर पिकांसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मुगाच्या क्षेत्रात लाल कांदा लागवड करण्यात येत आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने मुगाच्या उत्पन्नात मोठी घट आली. बाजरी काढणीला आली असून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे उत्पन्न हाती येण्याची शाश्वती नाही. मजूरही मिळत नाहीत. परिसरातील तलाव, बधारे कोरडे ठाक असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी जोरदार पावसाची गरज आहे.
-सूरज तोडमल, शेतकरी, जेऊर
मूग पीक पावसाअभावी वाया गेले. बाजरी काढणीला आली असून सुरू असलेल्या पावसामुळे चिंता निर्माण झाली आहे. अद्याप गावरान कांदा वखारीत पडून आहे. भावाअभावी कांदा विकता येत नाही. कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. लाल कांद्याची लागवड करून देखील उत्पन्नाची तसेच भावाची हमी नाही. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे.
-सोपान आव्हाड, शेतकरी, पांगरमल