

पाथर्डी: पाथर्डी न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन पाथर्डी न्यायालयाचे न्यायाधीश रविकिरण सपाटे यांच्या हस्ते झाले. त्यात 1213 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या प्रसंगी न्यायाधीश शिरीषकुमार वाघमारे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राणा खेडकर, उपाध्यक्ष वैजनाथ बडे, सचिव पी.एम. भाबड, तसेच स्टेट बँक, ऑफ इंडिया सेंट्रल, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक, प्रतिनिधी, तसेच गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, पक्षकार, तसेच वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.
न्या. सपाटे म्हणाले, लोकन्यायालयात मिळणारा न्याय हा दीर्घकालीन असतो. न्यायालयीन प्रक्रियेत होणारा वेळेचा व पैशाचा अपव्यय, तसेच मानसिक ताणतणाव टाळण्यासाठी लोकन्यायालय सर्वोत्तम व्यासपीठ आहे. येथे तडजोडीद्वारे वाद मिटल्याने दोन्ही पक्षांचे प्रश्न संपुष्टात येतात आणि पुढील आयुष्य कुटुंबासह आनंदाने व्यतीत करता येते. वादाने प्रश्न सुटत नाहीत, तर परस्पर सामंजस्याने हातात हात घालून ते मिटवावे लागतात. (Latest Ahilyanagar News)
ॲड. राणा खेडकर म्हणाले, जास्तीत जास्त पक्षकारांनी आपले तंटे लोकन्यायालयामार्फत सामंजस्याने मिटवावेत. त्यामुळे न्याय मिळविण्याचा वेग वाढतो आणि समाजात सौहार्दाचे वातावरण निर्माण होते.
या लोकन्यायालयात दाखल झालेल्या 1213 पूर्व खटल्यांचा निपटारा करण्यात आला. यात दिवाणी तसेच फौजदारी स्वरूपाचे बहुतेक खटले निकाली काढण्यात आले. पक्षकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने लोकन्यायालय यशस्वी ठरले.दीर्घकालीन व न्याय्य तोडगा लोकन्यायालयातून मिळतो.वेळ, पैसा व मानसिक त्रासाची बचत होते. कुटुंबीय ऐक्य टिकविण्यास लोकन्यायालय प्रभावी ठरत आहे. सूत्रसंचालन नितीन वायबसे यांनी केले.