

नगर: शिर्डीत सावकारकीच्या माध्यमातून बळकावलेली जमीन खरेदीसाठी साडेपाच कोटी रुपये कोठून आणले? या प्रश्नाचे उत्तर पोलिस भोंदू खरातकडून वदवून घेत आहेत. त्यासाठीच पोलिसांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने फसवणुकीच्या प्रकरणात भोंदू खरातला 9 मेपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान पसार कल्पना खरातचा ठावठिकाणाही भोंदू खरातच्या माध्यमातून शोधला जात असल्याचे समजते.
शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांची साडेचार एकर जमीन खासगी सावकारकीतून भोंदू खरातने बळकावल्याच्या गुन्ह्यात भोंदू अशोकखरात हा मुख्य आरोपी असून त्याची पत्नी कल्पना व इतर अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. शिर्डीच्या गुन्ह्यात त्याचा ताबा अहिल्यानगर पोलिसांकडे आला आहे.
नाशिकमधील गुन्ह्याच्या तपासात भोंदू खरातचे अनेक कारनामे समोर आले. बाजारभावानुसार 50 कोटीची साडेचार एकर जमीन भोंदू खरातने साडेपाच कोटीस सावकारकीतून दोन टक्क्यांच्या व्यवहारात विकत घेतली. भोंदू अशोक खरातला मंगळवारी राहाता न्यायालयात हजर केले होते. सरकारच्या वतीने ॲड. गौरव बोर्डे यांनी बाजू मांडली.
दरम्यान, जमीन खरेदीसाठी साडेपाच कोटी रुपये कुठून आणले, या व्यवहारात आणखी कोणी सहभागी आहे का, गोंदकर यांच्याशी केलेला करार, साठेखत, खरेदीखत, त्यावरील स्वाक्षरी कोणाची होती तसेच अरविंद बावके, किरण सोनवणे, अशोक तांबे यांचा यात काय रोल होता या प्रश्नांची उत्तरे पोलिस खरातकडून घेणार असल्याचे समजते. पत्नी कल्पना खरात हिला या व्यवहाराची माहिती होती की नाही? यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपी खरात याला शनिवारपर्यंत (दि.9) पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिर्डीत आणखी व्यवहाराची शंका..!
दरम्यान, खरातचे शिर्डीत आणखी काही व्यवहार आहे का, ब्लॅक मनी व्हाईट केला जात होता का, या दिशेनेही पोलिस तपास करणार आहेत. पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे तपासावर लक्ष ठेवून आहेत. पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांचे पथक तपास करत आहेत.