

नगर: दोन महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करत प्रशासकाच्या हाती कारभार सोपविण्यात आला आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग 1) गौतम निकाळजे यांनी प्रशासक पदाचा पद्भार घेत बँकेची सूत्रे हाती घेतली.
नगर जिल्हा बँकेची 2021 मध्ये 21 जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्या संचालक मंडळाची मुदत 20 फेब्रुवारी 2026 रोजी संपुष्टात आली. त्यामुळे बँकेच्या आगामी निवडणुकीचे संकेत लागले होते. मात्र, शासनाने वेगळ्या वेगळ्या कारणांनी, तसेच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमुळे सहकारातील निवडणुकांना 31 मे पर्यंत ‘ब्रेक’ दिला होता. या निर्णयाने तीन साखर कारखान्यांसोबतच जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रियाही लांबणीवर पडली.
या पार्श्वभूमीवर शासनाने गत आठवड्यात राज्यातील मुदत संपलेल्या 13 जिल्हा बँकांचे संचालक मंडळ बरखास्त केले. मुदत संपलेल्या तेराही जिल्हा बँकांवर प्रशासक नियुक्त करऱ्याचे आदेश काढले.
परिणामी अहिल्यानगर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन, त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती झाली. जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांनी सोमवारी (दि.4) प्रशासक म्हणून जिल्हा बँकेची सूत्रे ताब्यात घेतली. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे उपस्थित होते.
‘प्रारुप’च्या हालचाली
शासन निर्णयानुसार आता नगरच्या जिल्हा बँकेचेही संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. आता प्रशासक निकाळजे हे दैनंदिन कारभार पाहणार आहेत. त्यातच, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी तयार करण्याच्या सूचनाही लवकरच प्राप्त होण्याची शक्यताही सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मे महिन्यातच बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तोपर्यंत बँकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असणार आहे.