

नगर: शिर्डीतील जमीन खरेदी व्यवहारात सावकारकीचा इन्कार करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा बुरखा अखेर पोलिसांनी फाडलाच. व्यवहाराच्या बोलणीवेळी उपस्थित तिघा साक्षीदार आणि भोंदू खरातला पोलिसांनी समोरासमोर बसविले. त्यावेळी साक्षीदार व भोंदू खरात यांच्यात शाब्दीक फैरी झडल्या. फिर्यादीतील सावकारकीच्या उल्लेखावर साक्षीदार ठाम राहिल्याने भोंदू खरातच्या खोटारडेपणाचा बुरखा अखेर या चौकशीत टराटरा फाटला.
भाऊसाहेब चौधरी, प्रभाकर गुंजाळ आणि सचिन वाणी यांना पोलिसांनी बोलवल्यानंतर त्यांच्यासमोर खरातला बसविले. फिर्यादीत ज्या सावकारकीचा उल्लेख झाला, तोच जबाब साक्षीदारांनी खरातच्या समोरही कायम ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. या चौकशीवेळी खरात व साक्षीदारांची शाब्दीक चकमकही झाली. मात्र साक्षीदार भूमिकेवर कायम राहिल्याने खरात मात्र तोंडघशी पडला.
दरम्यान, खरातची पाच दिवसांची पोलिस कोठडी आज शनिवारी (दि.9) संपणार आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाईल. तसेच 31 मे पर्यंत या गुन्ह्याचे चार्जशीट सादर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांची चार एकर जमीन भोंदू अशोक खरातने साडेपाच कोटींमध्ये सावकारकीने पैसे देऊन बळकावल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल आहे.
भोंदू खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, अशोक तांबे, अरविंद बावके, किरण सोनवणे असे पाच आरोपी या गुन्ह्यात आहेत. यातील अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांच्यानंतर भोंदू खरातला अटक झाली. मात्र त्याची पत्नी कल्पना व अशोक तांबे हा पसार आहेत. पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक निवांत जाधव हे खरातची कसून चौकशी करत आहेत. खरेदीखत, साठेखत, रक्कमांचे व्यवहाराबाबत विचारणा करताच त्याने व्यवहाराची कबुली देताना, मात्र सावकारीचा इन्कार केला होता. बावके आणि सोनवणे यांनीच ती जमीन दाखवली. साक्षीदारांनी एकत्र येऊन मला अडचणीत आणल्याचा अजब दावा केला, पण त्याचा हा खोटारडेपणा शुक्रवारी उघडा पडला.
अगोदर चार्जशीट नंतर ‘समता’ची चौकशी
जमीन फसवणूक प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. आता 31 पर्यंत तपासाचे चार्जशीट तयार करण्याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे वेळेअभावी समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील खात्यासंदर्भात दाखल गुन्ह्याचा तपास काहीसा लांबणीवर पडणार असल्याचे चित्र समोर येवू पाहत आहे. खरातला नाशिकच्या गुन्ह्यात वर्ग केले जावू शकते. त्यानंतर त्याला पुन्हा ‘समता’मधील खात्यासंदर्भात दाखल गुन्ह्यात अटक केली जावू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.