

शिर्डी: श्री गुरुपौर्णिमा उत्सवात साई दर्शनासाठी येणार्या भक्तांच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे. साई संस्थानच्या वतीने सुमारे पाच लाख साईभक्तांना निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या असून, तब्बल 210 क्विंंटल बुंदी आणि लाडू प्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, गुरूशिष्य परंपरा फार प्राचीन आहे. आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. साईबाबा हयातीत असलेपासुन गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठया उत्साहात साजरी केली जात आहे. त्यामुळे या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्व आहे. गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त वेगवगळया ठिकाणांहुन येणा-या 30 पालख्यांनी नोंदणी केलेली आहे.
1 लाख 66 हजार 272 भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आलेल्या असून 3 लाख 50 हजार देणगीदार साईभक्तांना ईमेलव्दारे आंमत्रित करण्यात आलेले आहे. अमेरीका येथील दानशुर साईभक्त सुब्बा पै यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
उत्सवात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्यवस्था सुखकर व्हावी, तसेच भाविकांचे पावसापासुन संरक्षणाकरीता मंदिर व संस्थान परिसरात सुमारे 63 हजार 700 चौ.फुट मंडप उभारण्यात आलेले आहेत. दर्शनरांगेत व परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्प्लेक्स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्तनिवासस्थान (500 रुम), व्दारावती भक्तनिवासस्थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, नविन दर्शनरांग, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.
साईभक्तांच्या अतिरिक्त निवासव्यवस्थे करीता साईबाबा भक्तनिवासस्थान 500 रुम, साईधर्मशाळा याठिकाणी सुमारे 29 हजार 500 चौ.फुट निवासी पावसाळी मंडप, बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्यात आलेली असून यामध्ये विद्युत, पाणी पुरवठा, स्वच्छतागृह व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. पुणे ते शिर्डी येणार्या पालख्यांना थांब्यांचे ठिकाणी साधारण 33 हजार चौ.फुट पावसाळी मंडप उभारणेत आलेले आहे. संस्थानचे सर्व निवासस्थान येथे एकुण 17,759 साईभक्तांची निवास व्यवस्था होणार आहे. तसेच तात्पुरत्या स्वरुपात 2,500 साईभक्तांची निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे.
उत्सव काळात श्री साईप्रसादालयात अंदाजे 3 लाखाहून अधिक साईभक्त प्रसाद भोजन घेतील असे नियोजन करणेत आलेले आहे. तीन दिवस उत्सवात वेगवेगळे मिष्ठान्न प्रसाद भोजनात देणेत येणार आहे.
उत्सवाच्या प्रथम दिवशी बुधवार दि. 9 जुलै रोजी पहाटे 5.15 वा. श्रींची काकड आरती, पहाटे 5.45 वाजता श्रींची पोथी व प्रतिमा मिरवणूक, 6 वा. व्दारकामाई मंदिरामध्ये श्री साईसच्चरित्र ग्रंथाचे अखंड पारायणास सुरवात, उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवार दि. 10 जुलै रोजी पहाटे 5.15 वा. श्रींची काकड आरती, पहाटे 5.45 वा. अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींचे पोथी व प्रतिमा मिरवणूक होईल. या दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. उत्सवाच्या सांगता दिनी शुक्रवार दि. 11 जुलै रोजी पहाटे 6 वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 6.50 वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी 7.00 वा. श्रींचे गुरुस्थान मंदिर येथे रुद्राभिषेक, सकाळी 10 ते 12 यावेळेत प्राची व्यास यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम तर दुपारी 12.10 वा. श्रींची माध्यान्ह आरती होईल, असे गाडीलकर यांनी सांगितले.
मंदिर परिसर व शिर्डी परिसरात बंदोबस्त चोख ठेवण्यासाठी संस्थान सुरक्षा विभागाचे संरक्षण कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, शिघ्र कृतीदल पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहे. याबरोबरच श्री साईबाबा संस्थान, पोलिस प्रशासन व शिर्डी नगरपंचायत यांचे संयुक्त अतिक्रमण व दलाल प्रतिबंधक पथक ही सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.
गुरुस्थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, नविन दर्शनरांग, शांतीनिवास इमारत दर्शनरांग, मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप, श्री साईआश्रम 1000 रुम व श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु राहणार आहे. या ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहीका ही तैनात करण्यात आलेल्या आहेत. जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
श्रींचे दर्शनानंतर मोफत बुंदी प्रसाद देण्यात येतो. यावर्षी 60 क्विंटलचे 3 लाख मोफत बुंदी प्रसाद पाकिटे बनविण्याचे नियोजन असून उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी विक्री करीता 150 क्विंटलचे 4 लाख लाडूप्रसाद असे एकूण 210 क्विंटलचा बुंदी व लाडु प्रसाद बनविण्याचे नियोजन आहे. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.