

शिर्डी: श्री साईबाबा समाधी मंदिरात सोमवार, दि. 22 पासून ‘ब्रेक दर्शन’ व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. भाविकांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार आणि वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दर्शन प्रक्रियेला अधिक सुलभ, सुरक्षित व शिस्तबद्ध करण्याच्या द़ृष्टीने श्री साईबाबा संस्थानाच्या तदर्थ समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
विविध शासकीय विभाग, अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी-माजी विश्वस्त आणि इतरांच्या शिफारशीद्वारे सध्या जनसंपर्क विभागाकडे संपूर्ण दिवसभरात ‘प्रोटोकॉल दर्शन’ व्यवस्थेची मागणी केली जाते. (Latest Ahilyanagar News)
मात्र, अशा शिफारशीमुळे सामान्य रांगेतून येणार्या भक्तांच्या दर्शनात अडथळा येतो आणि सुरक्षा, पोलिस तसेच जनसंपर्क विभागावर अतिरिक्त ताण येतो. यावर उपाय म्हणून आता शिफारसप्राप्त मान्यवरांचे दर्शन केवळ सोबतच्या ‘ब्रेक दर्शन’ वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याचे गाडीलकर यांनी स्पष्ट केले. महत्त्वाच्या व्यक्ती तसेच एक लाख रुपयांच्या वरील देणगीदार साईभक्त यांना प्रोटोकॉल अंतर्गत दर्शन सुविधा यथावत सुरू राहील, असे संस्थानतर्फे स्पष्ट केले.
ब्रेक दर्शनासाठी अनिवार्य प्रक्रिया
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विविध विभागांच्या अधिकृत प्रतिनिधींनी संस्थानच्या जनसंपर्क विभागाकडे आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत साईभक्तांनी ब्रेक दर्शन वेळेच्या अर्धा तास अगोदर संस्थान जनसंपर्क विभागात उपस्थित राहून सशुल्क पास प्राप्त करणे बंधनकारक असेल. या पासधारक साईभक्तांना केवळ जनसंपर्क विभागामार्फत निश्चित वेळेतच ब्रेक दर्शनाची सुविधा दिली जाईल.
ब्रेक दर्शन वेळापत्रक :
सकाळी 9 ते 10
दुपारी 2.30 ते 3.30
रात्री 8 ते 8.30