

शिर्डी: साईबाबा मंदिर परिसरात द्वारकामाईत साईबाबा मंदिर विभागाच्या कर्मचार्याला व्हिक्टोरिया राणीचे चित्र असलेले सोन्याचे घड्याळ सापडले. त्यांनी ते संस्थानाकडे जमा केले आहे. मंदिर विभागाचे कर्मचारी रशीद गुलाब शेख आणि संरक्षण विभागाच्या महिला कर्मचारी रंजना कुंभार ड्युटीवर असताना साईबाबा ज्या पवित्र शिळेवर बसत, तेथे रशीद शेख यांना सोन्याचे घड्याळ सापडले.
त्याची माहिती तत्काळ साईबाबा संस्थान सुरक्षा अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी व संरक्षण कर्मचारी रंजना कुंभार यांना दिली. घड्याळ संरक्षण कार्यालयात जमा करताना लक्षात आले की ते सोन्याचे आणि अत्यंत मौल्यवान आहे. सोनाराकडून वजन करून पाहिले असता त्याचे वजन 22 ग्रॅम होते.
सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. या घड्याळाच्या डायलवर ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांची प्रतिमा आहे. त्यामुळे घड्याळाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
साईबाबा संस्थानच्या या दोन्ही कर्मचार्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कुठलाही मोह न ठेवता घड्याळ संरक्षण कार्यालयात जमा केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांनी त्यांचे कौतुक केले.