

शिर्डी: उभ्या असलेल्या कंटेनरला हायरायडर कारने जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की कारचा चक्काचूर झाला. भोंदू खरातच्या शिर्डीतील जमीन हडपल्याच्या प्रकरणात साक्षीदार असलेले डॉ. जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमध्ये अडकून पडलेल्या अनुराधा यांचा मदतीसाठी टाहो सुरू होता. त्यांची आर्त हाक ऐकून स्थानिकांनी मदतीसाठी प्रयत्न केले, पण तेही अपयशी ठरले. घशाला कोरड पडेपर्यंत दीड तास मदतीची याचना करणाऱ्या अनुराधा यांच्यावर काळाने घाला घातलाच. या दुर्दैवी घटनेने शिर्डीवर शोककळा पसरली आहे.
डॉ. जितेंद्र गणपत शेळके हे शिर्डीतील उद्योजक होते. सामाजिक कार्यातही त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. सिल्वर ओक बिल्डकॉनचे सर्वेसर्वा असलेले डॉ. जितेंद्र हे ‘ग्रीन एन क्लीन शिर्डी’ या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण क्षेत्रातही कार्यरत होते. पत्नी अनुराधा यांना सोबत घेत त्यांनी सिल्वर ओक फौंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून अनुराधा यांनी गावखेड्यातील मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. नेवासा, श्रीरामपूर परिसरातील कालवे रुंदीकरणासाठी पुढाकार घेत ‘जनकल्याण संघ’ स्थापन केला.
शिर्डी परिक्रमा सुरू झाल्यानंतर त्यात डॉ. जितेंद्र यांचा सहभाग हमखास असायचा. काही वर्षे अमेरिकेत वास्तव्य केलेले डॉ. जितेंद्र यांना मायभूमी शिर्डीची ओढ लागली. त्यातूनच ते अमेरिकेला बायबाय करत शिर्डीत परतले. शिर्डीत त्यांनी उद्योग, शिक्षण, पर्यावरणासह सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविला. दरम्यानच्या काळात दुर्दैवाने त्यांचा अशोक खरातशी संबंध आला. अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर ते उपाध्यक्षही राहिले. शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात डॉ. जितेंद्र यांचे नाव पुढे आले.
मात्र खरातचा भोंदू चेहरा समोर येताच त्यांनी शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. खरातच्या भोंदूगिरीत त्यांचा प्रत्यक्षात कोठेच संबंध नसला तरी नाव जोडले गेल्याने ते काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याची चर्चा होती. मात्र भोंदू खरात सोबतच्या सर्व संबंधांचा इन्कार करत त्यांनी स्वत:ला त्यातून सावरले. शिर्डीत भोंदू खरात विरोधात दाखल फसवणूक, सावकरीच्या गुन्ह्यात ते महत्त्वाचे साक्षीदार होते. डॉ. जितेंद्र यांच्या सहभागाचे सबळ पुरावे हाती न लागल्याने शिर्डी पोलिसांनी त्यांना साक्षीदार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला.
डॉ. जितेंद्र यांची वर्तणूक पाहता शिर्डीतील अनेकांच्या मदतीला धाऊन जाणारे अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. सामाजिक, उद्योजक जगतात ठसा उमटविणाऱ्या शेळके दाम्पत्याच्या मृत्यूने अवघी शिर्डी हळहळल्याचे दिसून आले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलो. कारमधून मुलगा सुजित यास सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. कारमधून महिलेचा मदतीसाठी धावा सुरू होता, पण कार कंटेनरखाली अडकल्याने त्यांना बाहेर काढणे मुश्कील होते. मदतीसाठी क्रेनही उशिराने पोहचले. त्यानंतर कारमधून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
प्रदीप चव्हाण, सरपंच, धोत्रे