

श्रीरामपूरः श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षासह नगरसेवकपदांसाठी मंगळवारी मतदानासाठी वापरलेले श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया 2 डिसेंबरला पार पडली. यानंतर 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत लांबल्याचे आदेश आल्यामुळे ईव्हीएम मशिन्स् स्ट्राँग रूममध्ये बंदिस्त करण्यात आले आहेत. ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी सशस्त्र पोलिस बळासह राज्य पोलिस तैनात करण्यात आले आहेत. साधारणतः तीन टप्प्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. यानंतर रात्री 11 वाजता अंतिम आकडेवारी हाती आली, मात्र निवडणूक निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबल्यामुळे ईव्हीएम मशिन्स मुख्य प्रशासकीय इमारतीमधील स्ट्राँग रूममध्ये बंदिस्त करण्यात आले आहेत.
कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व उमेदवारांना प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे. याद्वारे सूचना- अधिसूचना त्यांना केल्या केल्या आहेत. नियमांचे काटेकोर पालन करा, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. सीसीटीव्ही लावले आहेत. येथे काही उमेदवार आपले प्रतिनिधी नियुक्त करू शकतात, त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था असणार आहे.
26991 पुरुष तर, 26933 स्त्रीया अशा एकूण 53954 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीरामपूर नगरपालिकेसाठी 66.62 टक्के मतदान झाले. मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रभागातील इव्हीएम मशीन्स सुरक्षित, कडेकोट बंदोबस्तात हलविले आहेत.
नगराध्यक्षपद एका जागेसाठी 9 तर, नगरसेवक पदांच्या 33 जागांसाठी 142 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. 80899 पैकी सुमारे 53954 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
135 कॅमेरे लाऊन, शहरातील सर्व 89 मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात आली. नियंत्रण तहसील कार्यालयातून करण्यात आले. तक्रार प्राप्त ठिकाणावर तत्काळ बदल करण्यात आले. प्रभाग क्र. 16 व प्रभाग 8 सह अन्य एक- दोन ठिकाणी इव्हीएम मशीन्स बंद पडले होते, मात्र ते तत्काळ दुरुस्त करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा, प्रांताधिकारी किरण सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा, तहसीलदार मिलिंद वाघ व पालिका मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह वरिष्ठ अधिकारी टप्प्या-टप्प्यांमध्ये स्ट्राँग रूमची पाहणी करणार आहेत.
ईव्हीएम मशिन्स सुरक्षेसाठी दुहेरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यामध्ये सशस्त्र पोलिस 1 + 2, राज्य पोलिस 1 + 3 अशी तब्बल 12-12 तासांच्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.