

शेवगाव: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाबाबत केवळ चर्चा व चिंता व्यक्त करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. खरीप पिके मोठ्या प्रमाणात वाया गेल्याने शासनाने तातडीने शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत व दुष्काळी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी केली.
शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), राज्य किसान सभा, शिवसेना (उ बाठा) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. १६) तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या दुष्काळविषयक भूमिकेबाबत संताप व्यक्त केला.
ॲड. लांडे म्हणाले, “संपूर्ण खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, शासन दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करीत आहे.” कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केल्याचा दाखला देत महाराष्ट्र शासनानेही तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेवगाव तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पेरणी, मशागत आणि बियाण्यांसाठी खर्च करूनही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी तहसीलदार आकाश दहाडदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पीक विमा योजनेअंतर्गत आगाऊ विमा मंजूर करावा, कृत्रिम पावसाचे नियोजन करावे, दिवसा अखंड व सुरळीत वीजपुरवठा करावा तसेच शेतकरी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या शुल्कात माफी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. वाढती महागाई नियंत्रणात आणण्याची मागणीही करण्यात आली. शासनाने लवकर दुष्काळ जाहीर करून उपाययोजना केल्या नाहीत, तर शेवगाव तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष ॲड. अविनाश मगरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे यांनी दिला.
यावेळी कॉ. संदिप इथापे, किसान सभेचे बापूराव राशिनकर, बबनराव पवार, विष्णू गोरे, गोरक्षनाथ काकडे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रामनाथ गोल्हार, राजेंद्र दळवी, ॲड. अविनाश मगरे, कानिफनाथ कर्डिले, अजिंक्य लव्हाट, उदय गांगुर्डे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, मच्छिंद्र आरले, राम लांडे, भिवसेन घोरपडे, अर्जुन खैरे, बाळासाहेब म्हस्के, शंकर देवडे, मुरलीधर काळे, विष्णू चव्हाण, भीमराज ढगे, विठ्ठल उगले, बाळा बागल यांच्यासह सर्व पक्ष कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.