

श्रीगोंदा: जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ थांबवण्यासाठी नवीन सात पोलिस ठाणी व वाढीव कर्मचारी मिळावेत, अशी लक्षवेधी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यासाठी सात नवी पोलिस ठाणे व 550 अधिकारी- कर्मचारी देण्याचे आश्वासन सभागृहात देऊन श्रीगोंद्यासाठी स्वतंत्र उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली.
आ. विक्रमसिंह पाचपुते यांनी दोन्ही अधिवेशनात प्रश्न मांडून राज्यात सर्वांचेच लक्ष वेधले. या अधिवेशनात गृहविभागाबाबत लक्षवेधी मांडून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून जिल्ह्यासाठी नवीन सात पोलिस ठाणे व साडेपाचशे अधिकारी-कर्मचारी मंजूर करून घेतले. (Latest Ahilyanagar News)
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे यापूर्वी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी प्रतिनिधित्व केले आहे. आता त्यांचे चिरंजीव आ. विक्रमसिंह पाचपुते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अतिशय पोटतिडकीने सामाजिक प्रश्न मांडून वरिष्ठ मंत्र्यांकडून प्रश्न सोडवून घेत आहेत. मागील अधिवेशनात बनावट पनीरच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले होते. त्या वेळी अजित पवार यांनी तत्काळ बैठक लावून कारवाई सुरू केली.
या वेळी पावसाळी अधिवेशनात गुटखा व मावा या विषयावर लक्षवेधी मांडली. त्यानंतर जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात कारवाई चालू झाल्या. त्याचबरोबर पोलिस विभाग हा राजकारण्यांच्या दृष्टीने दुर्लक्षित विभाग होता. पण त्या विभागाच्या अडचणी काय आहेत ते परखडपणे आ. पाचपुतेंनी सभागृहात मांडल्या.
यामध्ये पोलिसांना सातवा वेतन आयोग मंजूर असताना अद्यापही सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे भत्ते मिळत आहेत. तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे, अशी भूमिका मांडली. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 17 हजार 413 चौरस किमी आहे. पण यासाठी फक्त 3 हजार 313 पोलिस बळ आहे. त्यामुळे पोलिसांवर मोठा ताण येत आहे. जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ थांबवण्यासाठी नवीन सात पोलिस ठाणे व वाढीव कर्मचारी मिळावेत अशी लक्षवेधी आ. पाचपुते यांनी मांडली.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीला उत्तर देत जिल्ह्यासाठी सात नवी पोलिस ठाणे व 550 अधिकारी-कर्मचारी देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर श्रीगोंद्यासाठी स्वतंत्र उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी देण्याबाबत सकारात्मकता दाखवली. याबाबत एक महिन्यात तत्काळ कार्यवाही करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे पाचपुते कुटुंबावर विशेष प्रेम
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा 2014ला पराभव झाला होता. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने त्यांनी श्रीगोंदा तालुक्यासाठी निधी कमी पडू दिला नाही. सध्याही जिल्ह्यासाठी पोलिस ठाणे व वाढीव अधिकारी कर्मचारी देण्याचे आश्वासन दिल्यावरून मुख्यमंत्र्यांचे पाचपुते कुटुंबावर विशेष प्रेम असल्याचे दिसत आहे.