

MLA Kale demands blacklisting of companies
कोळपेवाडी: जल जीवन मिशन योजने अंतर्गत कोपरगाव मतदार संघातील धारणगाव, सुरेगाव, शिंगणापूर पाणी पुरवठा योजना, पिंपळवाडी-नपावाडी, मळेगाव थडी, मायगाव देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे रखडवणार्या ‘त्या’ दोन कंपन्यांना आ.आशुतोष काळे यांनी दणका दिला आहे. पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू होताच औचित्याचा मुद्दा उपस्थित करून त्या दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
जयंती सुपर कन्स्ट्रक्शन प्रा.लि.मेहसाणा व सहज कन्स्ट्रक्शन इंडिया एल.एल.बी.प्रा.लि. या दोन कंपन्यांना तीन वर्षापूर्वी कोपरगाव मतदार संघातील धारणगाव, सुरेगाव, शिंगणापूर, पिंपळवाडी-नपावाडी, मळेगाव थडी, मायगांव देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे देण्यात आली होती. (Latest Ahilyanagar News)
दोन वर्षाची मुदत असताना वारंवार मुदतवाढ देवूनही आजतागायत या कंपन्या पाणी योजनांची कामे पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आ. आशुतोष काळे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत कामात हलगर्जीपणा करून नागरीकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणार्या या दोन कंपन्यांची कामे रद्द करा. आणि या कंपन्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी सभागृहाकडे केली.
आ.आशुतोष काळे म्हणाले की, या दोन कंपन्यांच्या ठेकेदारांना पाणी पुरवठा योजनांची कामे सुमारे तीन ते साडे पाच टक्के वाढीव दराने देण्यात येवून सदर योजनांची कामे जून 2022 ते जुलै 2024 या कालावधीत पूर्ण करण्याची अट होती. परंतु सदर कालावधीत काम पूर्ण न झाल्यामुळे काम अर्धवट अवस्थेत होते. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना जून 2025 अखेर पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली होती.
परंतु मुदतवाढ देऊन सुद्धा या कंपन्यांकडून या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देता आलेली नाही त्यामुळे ह्या पाणी पुरवठा योजनांची कामे अद्यापही रेंगाळलेली आहेत. आणि ह्या योजनांची झालेली जी काही अर्धवट कामे आहेत ती कामे सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्याबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आलेल्या आहेत.
कंपनीने काम करतांना हलगर्जीपणा करून गावातील नागरिकांना जाणीवपूर्वक पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा गंभीर प्रकार केला आहे. ही कामे रेंगाळली असल्यामुळे या पाणी पुरवठा योजनांच्या कामाबाबत अनिश्चितता निर्माण होऊन गावातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु हे ठेकेदार त्यांना वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे भासवत असून पाणी पुरवठा योजनांची कामे कितीही संथ गतीने केली तरी आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही.
याचा त्यांना आत्मविश्वास असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. परंतु कुणाला कितीही मोठा राजाश्रय असला तरी काम करावेच लागते. त्यामुळे कराराप्रमाणे वेळेत काम न करणार्या या दोन कंपन्यांना देण्यात आलेली पाणी पुरवठा योजनांची कामे रद्द करावीत.नव्याने टेंडर काढून या पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करावीत व या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे.