

करंजी: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे दर गुरुवारी भरणार्या आठवडे बाजाराच्या दिवशी विक्रेत्यांना विशेषतः शेतकर्यांना नदी-नाल्याजवळ बसून दुर्गंधीत भाजीपाला विकावा लागत आहे. त्यामुळे जागेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या बाजारात भाजी खरेदी-विक्रीसाठी परिसरातील पंधरा ते वीस गावांतील लोक येथे येतात. त्यामुळे आठवडे बाजारच्या दिवशी मोठी गर्दी होते. परंतु गेल्या अनेक दिवसापासून आठवडे बाजारच्या जागेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बहुतांश भाजी विक्रेते कल्याण-निर्मळ या राष्ट्रीय महामार्गवरच भाजी विक्रीसाठी बसतात. (Latest Ahilyanagar News)
त्यामुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होते. तिसगावचा आठवडे बाजारसाठी मोठी जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी नदी-नाल्याजवळ दुर्गंधीच्या ठिकाणी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून भाजी विक्री करतात. एवढेच नव्हे, तर आजूबाजूंच्या अनेक लोकांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्यामुळे आठवडे बाजारला जागाच शिल्लक राहिलेली नाही.
शेतकर्यांना, तसेच भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना जीव धोक्यात घालून या ठिकाणी भाजी विक्री करावी लागते. ज्या ठिकाणी शेतकरी भाजी विक्रीसाठी बसतात, तेथूनच मोठ्या प्रमाणात गावातील सांडपाणी वाहते. त्याची दुर्गंधी सुटते.
नदीकाठच्या लोकांनी जागा खरेदी करून रस्त्यापर्यंत नदीपात्रात मालकी हक्क सांगत जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी ग्रामपंचायतीच्या जागेतच पत्र्याचे शेड, टपर्या टाकल्याने आठवडे बाजारच्या दिवशी शेतकर्यांनी कुठे बसायचं, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही लोक आठवडे बाजारच्या दिवशी महामार्गाच्या कडेलाच दुचाकी, चार चाकी वाहने उभी करून बाजारात फेरफटका मारतात, अशावेळी सुद्धा वाहतूक कोंडी होत आहे. बाजारतळापासून वृद्धेश्वर चौकापर्यंत भाजी विक्रेते बसू लागल्यामुळे हा संपूर्ण परिसर आता गुरुवारच्या दिवशी वाहतूक कोंडीच्या दृष्टीने मोठा अडचणीत ठरत आहे.
पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतीला पत्र देऊन आठवडे बाजारला सुरक्षित जागेची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. तिसगावमधील नदी-नाल्यांसह ग्रामपंचायतीच्या जागेवर ताबा मारण्याचे प्रकार वाढल्याने संपूर्ण तिसगाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.