

दीपक देवमाने
जामखेड: राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती गट-गणांची संख्या निश्चित करून फेररचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये गट-गणांची संख्या 2022 च्या तत्कालीन महाविकास सरकारने निश्चित केलेलीच अंतिम केली आहे. आता या संख्येनुसार नव्याने गट-गणरचना करण्यात येणार असून, राज्य आणि जिल्ह्यात झालेल्या सत्तांतर व बदलत्या राजकीय परिस्थितीचा मोठा परिणाम जामखेडमधील गट-गण रचनेवर पडू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. महायुतीचे मित्रपक्ष व महाविकास आघाडीचे मित्रपक्ष यांना यात किती जागा मिळतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Latest Ahilyanagar News)
जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे खर्डा, जवळा यांसह तिसरा गट होणार असल्याने इच्छुकांनी समाधान व्यक्त केले आहे. सन 2015 च्या अगोदर जामखेड, जवळा, खर्डा असे तीन गट होते; परंतु जामखेड शहराला नगर परिषद झाल्याने तो भाग जिल्हा परिषद गटातून कमी झाला. त्यामुळे तालुक्यात दोन गट राहिले. सन 2022 च्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातदेखील जामखेड तालुक्यात 3 गट ठेवण्यासाठी प्रयत्न झाले, पण ते अयशस्वी ठरले. यंदा एका नवीन गटाची निर्मिती होणार आहे.
कोरोना व नंतर ओबीसी आरक्षणाचा तिढा, यामुळे तब्बल चार-साडेचार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या. या काळात बदललेल्या राजकारणाचा गट-गण रचनेवर प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
त्यामुळे आमदार, खासदारांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. सध्या निवडणुका सन 2011 च्या जनगणनेनुसार होत आहे. असून, गेल्या 14 वर्षांत लोकसंख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे; परंतु वाढीव लोकसंख्येची अधिकृत माहिती नसल्याने जुन्याच लोकसंख्येच्या आधारे निवडणुका घेण्यात येत आहेत, त्यानुसार जिल्हा परिषदेचे गट-गण निश्चित करण्यात येणार आहेत.
अडीच तीन वर्षापूर्वी राज्यातील राजकीय भूकंपाचे परिणाम देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर झाले व प्रत्येक वेळी सत्ताधार्यांनी निवडणुका घेणे टाळले. अखेर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कान उघाडणी करीत चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. आता या आदेशानुसार शासनाने निवडणुकांसाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू केली आहे.
इच्छुकांचे देखील बारकाईने लक्ष
सन 2022 मध्ये तत्कालीन ठाकरे सरकारने निश्चित केलेली गट-गणसंख्याच देवेंद्र फडणवीस सरकारने आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निश्चित केली आहे. परंतु, आता या संख्येनुसार नव्याने गट-गणरचना करण्यात येणार असून, राज्य आणि जिल्ह्यात झालेल्या सत्तांतर व बदलत्या राजकीय परिस्थितीचा मोठा परिणाम गट-गणरचनेवर पडणार आहे.
गट व गण निश्चित करताना नियमात बसून आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या सोयीची रचना म्हणजे गावे कमी-अधिक करताना मोठ्या प्रमाणात राजकीय दबावा टाकून हवी तशी गट-गणरचना केली जाऊ शकते. त्यामुळे इच्छुकांचे देखील बारकाईने लक्ष असल्याचे दिसत आहे. या जिल्हापरिषद निवडणुकीत सभापती प्रा राम शिंदे व आ रोहित पवार यांची चांगलीच कसरत होणार आहे.
निवडणूक कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा मात्र सभापती प्रा राम शिंदे व आ रोहित पवार यांची गेल्या 9 महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली असून या निवडणुकीत आ रोहित पवार हे विजयी झाले तर सभापती प्रा राम शिंदे यांचा निसटला 1243 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विधानसभेची झालेली निवडणूक दोन्ही उमेदवारांना तशी सोपी गेलेली नाही.
त्यामुळे त्या चुरशीच्या निवडणुकीत आ रोहित पवार यांनी बाजी मारली असलीतरी सत्ता मात्र महायुतीची असल्यामुळे प्रा राम शिंदे यांना या रोहित पवार यांच्या विरोधात ताकद देण्यासाठी त्यांना सभापती पदी वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे सत्ता असल्यामुळे पुन्हा राम शिंदे यांचे पक्षासह राज्यात वजन वाढले आहे. त्यामुळे जिल्हापरिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची असली तरी प्रतिष्ठा मात्र सभापती राम शिंदे व आ रोहित पवार यांची राहणार आहे.