

नगर: तांडा मालकाने मारहाण केली म्हणून ते दोघे पळून नगरला आले. बालकल्याण समितीने अस्थेने त्यांची चौकशी केल्यानंतर तांड्यावरील बालमजुराची माहिती मिळाली. त्यानुसार भल्या पहाटे धाडसत्र राबवित 15 बालमजुरांची सुटका करण्यात आली.
सहाय्यक कामगार आयुक्त व बालकल्याण समिती आणि अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या पुढाकारातून ही शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीसमोर दोन बालके फिरत असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी या दोघांना बालकल्याण समितीसमोर हजर केले. (Latest Ahilyanagar News)
समिती अध्यक्षांनी या बालकांना धीर देत त्यांची अस्थेने विचारपूस केली. तांड्यावर मारहाण झाल्याने ही मुले पायी नगरला आल्याची माहिती त्या मुलांनी सांगितली. तांड्यावर आणखी 15 बालमजुर असल्याची त्यांच्याकडून समजातच धाडसत्राचे नियोजन करण्यात आले.
शेळ्या, गुरे चारणे, धुणी, भांडी आणि लहान मुलांचा सांभाळ करणे अशी कामे या बालमजुरांकडून करून घेतली जात असल्याचे समजले. कर्नाटक येथील कोळसा खाणीवर बालकांचे पालक मजुरीसाठी गेलेले आहेत. ते काम सोडून जावू नये यासाठी या बालकांना तांड्यावर ठेवण्यात आल्याची माहिती चौकशीत समोर आली.
बालकल्याण समिती, सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे संदीप हरमळकर, ललीत दाभाळे, उद्यकुमार सुर्यवंशी, सौरभ हामंद, बालकल्याण समिती या सदस्या अॅड अनुराधा येवले, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संस्थेचे दिलीप गुंजाळ, सिराज शेख, मंगेश थोरात, संध्या कुलकर्णी, मयुरी वनवे, महापालिकेचे आशिष हंस, पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने अजय बेरड, जालिंदर माने, अशोक लिपाने, रमाकांत गावडे, महिला पोलिस ज्योती शिंदे, चाईल्ड लाईनचे राहुल वैराळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.
हद्दीची चिंता सोडत काळजीपोटी कारवाई
गहुखेल (ता.आष्टी) येथील सेवालाल तांडा येथे बालमजुरांची सुटका करण्यासाठी गेलेल्या पथकाला ही बीड जिल्ह्याची हद्द असल्याची बाब लक्षात आली. बालकांची काळजी व संरक्षणच्या दृष्टीने धाडसत्राची कारवाई महत्वाची समजून कारवाई करण्यात आली. अंभोरे पोलिस ठाण्यामध्ये नोंद करुन पुनर्ववसन आणि काळजी व संरक्षणाच्यादृष्टीने बालकांना बीड बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले. नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त रेवनाथ डिसले यांनी बीडचे सहाय्यक कामगार आयुक्तांच्याशी त्वरित पत्र व्यवहार करत धाडसत्राची माहिती दिली.